

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहराचा नवीन सुधारित प्रारूप विकास आराखड्याबाबत (डीपी प्लॅन) नागरिकांचे आक्षेप वाढत आहेत. हरकतीचा अक्षरशः पाऊस पडत आहे. आत्तापर्यंत तब्बल 19 हजारपेक्षा अधिक हरकती प्राप्त झाल्या आहेत. हरकती नोंदविण्यासाठी सुटी वगळता केवळ सहा दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे हरकतींची संख्या 25 हजारांपेक्षा अधिक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रासह पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून वर्ग करण्यात आलेल्या क्षेत्राचा एकत्रित डीपी आराखडा महापालिकेने तयार केला आहे. (Latest Pimpri News)
शहरातील एकूण 28 गावांच्या एकूण 173.24 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या या डीपी आराखड्यात शहरातील विविध प्रकल्पांसाठी आरक्षणे तसेच, सार्वजनिक सेवा व सुविधांसह नवीन प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. डीपीतील आरक्षणाला नागरिकांचा विरोध असून, येणार्या दिवसांत हरकतींमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हरकतींची संख्या वाढण्याची शक्यता
डीपीबाबत नागरिकांकडून 14 जुलैपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. दिवसेंदिवस हरकतींची संख्या वाढतच चालली आहे. आत्तापर्यंत तब्बल 19 हजारांपेक्षा अधिक हरकती देण्यात आल्या आहेत. अखेरच्या सहा दिवसांच्या टप्प्यात हरकतींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे सांगितले जात आहे.
डीपीबाबत वाढता असंतोष
महापालिकेच्या या डीपीवर विधिमंडळ अधिवेशनात जोरदार आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. सत्ताधारी भाजपच्या आमदारांनी डीपी बिल्डरधार्जिन असल्याचा जाहीर आरोप केला आहे. त्या तक्रारींबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना दिले आहेत.
तसेच, डीपी अन्यायकारक असल्याचा आरोप करीत त्याच्याविरोधात शहरात मोर्चे, आंदोलन, धरणे करण्यात येत असून, नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे. शिल्लक असलेल्या शेतजमिनीवर आरक्षणे टाकल्याने भूमिपुत्र ही प्रचंड नाराज आहेत.
...या आहेत हरकती
लोकवस्ती आणि बाजारपेठेत 12, 18, 24 व 36 मीटर रुंदीचे रस्ते आरक्षण नको
एचसीएमटीआर (रिंगरोड)ची मार्गिका व स्टेशन प्रकल्प रद्द करा
अल्पसंख्याक समाजाची संख्या नगण्य असल्याने दफनभूमीचे आरक्षण नको
चिखलीतील कमर्शिअल कॉम्प्लेक्सचे आरक्षण नको
पवना नदीकडेची निळी पूररेषा चुकीची
कचरा हस्तांतरण केंद्र रद्द करावे
मोशीतील कत्तलखाना रद्द करा
पुनावळे कचरा डेपोच्या जागेत ऑक्सिजन पार्क हवे