

राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागातर्फे मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेसाठी शहरात विविध ठिकाणी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. शासनाच्या परिपत्रकामध्ये या योजनेसाठी अंगणवाडी सेविकांना देखील सहभागी करुन घेण्यात आले आहे. याबदल्यात त्यांना प्रत्येक लाभार्थीमागे 50 रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जाणार होता. मात्र, बहिणींच्या खात्यावर साडेसात हजार रुपये जमा होवूनही, अंगणवाडी सेविकांना अजून एक रुपयादेखील मिळाला नाही.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेपासून कुणीही वंचित राहू नये, यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन म्हणून पन्नास रुपये प्रत्येक अर्जासाठी देण्याचे शासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र, अद्याप एकाही अंगणवाडी सेविकेला त्या कामाचा मोबदला मिळालेला नाही. अंगणवाडी सेविकांसह सेतू केंद्र, आपले सरकार केंद्र, ग्रामसेवक, ग्रामपंचायतीचे कर्मचारी, आशा स्वंयसेविका यांनी अर्ज भरले आहेत. कुणी किती अर्ज भरले आहेत, याची प्रशासनाकडून अद्याप पडताळणी सुरू आहे. अंगणवाडी सेविकांनी अंगणवाड्या सांभाळून ऑनलाईन अर्ज भरण्याचे काम केले.
आम्ही भत्ता मिळावा यासाठी मागणी केली आहे. मागे निवडणूक काळात मानधनवाढीसाठी आमचे आंदोलन देखील सुरू होते. मधल्या काळात आचारसंहिता होती. अद्याप सरकार देखील स्थापन झालेले नाही. आता महिला बालविकास मंत्री कोण होईल, तोपर्यत मागणी तशीच राहिल.
नितीन पवार (अध्यक्ष, अंगणवाडी कर्मचारी सभा, पुणे)
मात्र, या कामामध्ये दिलेल्या मोबाईलमधील नेटचा स्पीड कमी असल्याने ऑनलाईन अर्ज भरण्यात अडचणी अडथळे आले होते. नियमित कामांव्यतिरिक्त, शासनाच्या विविध उपक्रमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणे, शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे राष्ट्रीय काम आणि राज्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यात अंगणवाडी सेविकांचा मोठा वाटा आहे. तसेच बहुतांश राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, उपक्रमांमध्ये या सेविकांना समाविष्ट करण्यात येते. लाडकी बहीण
योजनेचा ऑनलाइन अर्ज भरण्याचे प्रशिक्षण देखील त्यांना देण्यात आले होते. त्यामुळे शहर परिसरातील निरक्षर व अल्पशिक्षित महिलांनी जवळपासच्या अंगणवाड्यांमध्ये जाऊन या सेविकांकडून अर्ज भरून घेतले होते. अंगणवाडी सेविकांना नियमित काम करण्याबरोबर अर्ज भरण्याचे काम दिल्याने त्यांच्यावर कामाचा ताण वाढला. तसेच अर्ज भरताना एखादीचा अर्ज काही कारणास्तव भरला गेला नाही, तेव्हा वादालादेखील तोंड द्यावे लागले. लाडकी बहीण योजनेचा लाभ जास्तीतजास्त गरजू महिलांना लाभ मिळावा म्हणून अंगणवाडी सेविकांनी दिवसरात्र, मानपाठ एक करून प्रयत्न केले. त्यांनी केलेल्या या कामाचे पन्नास रुपये मिळतील का, हा प्रश्न पडल्याचे त्यांनी सांगितले.