

दापोडी: येथील पवना घाट व कासारवाडी येथे विसर्जन हौदाची दुरवस्था झाली आहे. गणेशोत्सवास प्रारंभ होत असताना मंगळवारी (दि. १५) दीड दिवसाच्या गणरायाचे विसर्जन करताना दापोडी पवना घाट व कासारवाडी येथील विसर्जन हौदाची गळती होत असल्याचे दिसून आले. यामुळे बाप्पांच्या विसर्जनाची वाट बिकट बनली आहे.
महापालिकेच्या वतीने नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गणरायाच्या विसर्जनासाठी कृत्रिम हौद नदीच्या घाटावर उभारले आहेत. यासाठी महापालिकेच्या वतीने लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र, दापोडीत बॉम्बे कॉलनीजवळ पवना नदी घाट आहे. या घाटावर जो हौद बनविलेला आहे त्या विसर्जन हौदाला आतून व बाहेरच्या बाजूने तडा गेलेला आहे. यामुळे गणपतीच्या विसर्जनासाठी पाण्याने हौद भरला की ते पाणी दहा मिनिटांत गळून जात आहे. पुन्हा पाणी टाकले तरी दहा मिनिटांत ते पाणी संपून जाते.
त्यामुळे स्थानिक गणेश भक्तांनी विसर्जन कसे आणि कोठे करायचे? हा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित अधिकाऱ्यांना कळविले असता तात्पुरती व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्याप्रसंगी आरोग्य निरीक्षक सचिन जाधव, आरोग्य मुकादम सतीश घोलप, आनंद कांबळे मोसिन शेख व ग्रामस्थ उपस्थित होते. संबंधित प्रशासनाने या गैरसोयीची दखल घेऊन त्वरित प्रश्न मार्गी लावावा. तसेच बाप्पांच्या विसर्जनाची वाट बिकट बनली आहे. ती वाट व्यवस्थित करून द्यावी, अशी मागणी गणेश भक्तांकडून होत आहे.
घाट परिसरात स्वच्छतागृहाचा अभाव
विसर्जन घाटावर तात्पुरते शौचालय नसल्याने नागरिक व कर्मचारी विशेषतः महिलांची मोठी गैरसोय होत आहे. शेकडो गणेशभक्त गणेश विसर्जन करण्यासाठी येतात. येथे रस्त्याची दुरवस्था, लाईट व्यवस्था नाही, यामुळे गणेश विसर्जनासाठी येणाऱ्र्या नागरिकांची गैरसोय होत आहे. महापालिका प्रशासनाच्या आवाहनाला नागरिक प्रतिसाद देत कृत्रिम हौदात गणरायाचे विसर्जन करत आहेत; परंतु विसर्जनाच्या ठिकाणी व्यवस्था नसल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
मंगळवारी सकाळी काही गणेशभक्त माझ्याकडे आल्यानंतर मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. त्या विसर्जन हौदाला तडे गेलेले होते. त्या हौदामध्ये पाणी टाकल्यानंतर दहा मिनिटांत पाणी जिरपून जात होते. आज दापोडीत गणेशभक्तांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. हे मी प्रत्यक्षदर्शनी पाहिले आहे. याबाबत मी लेखी पत्र देऊन त्वरित ही गैरसोय दूर करण्याची प्रशासनाकडे मागणी केलेली आहे.
राजू बनसोडे, नगरसेवक, दापोडी.
गणेशभक्तांच्या तक्रारी आल्यानंतर मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली आहे. त्या ठिकाणी बनविलेला जो हौद आहे त्या हौदाला तडे गेले आहेत. तडे गेल्यामुळे त्या हौदामधून पाणी गळती होत आहे. ही पाणीगळती थांबविण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, पाणीगळती थांबलेली नाही. यासाठी आम्ही नवीन प्लास्टिक टाकीची व्यवस्था आजच करणार आहोत.
सतीश घोलप, मुकादम, आरोग्य विभाग, दापोडी.