

Sant Tukaram Maharaj Palkhi 2025 Dehu
देहूनगरी : संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला बुधवारी (दि.१८) देहूगावात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. रिमझिम पाऊस पडत असतानाही वारकऱ्यांचा उत्साह कायम होता. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पालखी प्रस्थान सोहळ्याला प्रारंभ झाला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी संत तुकाराम महाराज मंदिरात दर्शन घेतले.
यावेळी त्यांच्यासोबत पुण्याचे खासदार आणि केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार महेश लांडगे आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.
मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंदिर परिसरात फुगडी खेळण्याचा अनपेक्षित आनंद घेतला. पारंपरिक वेशभूषेत मुख्यमंत्र्यांनी फुगडी खेळायला सुरुवात करताच उपस्थितांमध्ये चैतन्याची लाट उसळली. हा दुर्मिळ क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी अनेकांनी आपले मोबाईल पुढे केले.
सामान्य जनतेत मिसळून, त्यांच्या पारंपरिक खेळात सहभागी झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या साधेपणाचे आणि जनसंपर्काचे दर्शन घडले, असे उपस्थितांनी म्हटले. हा क्षण उपस्थित भाविकांसाठी आणि प्रसारमाध्यमांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला. मुख्यमंत्र्यांच्या या कृतीमुळे सोहळ्याला आणखी रंगत आली.