PCMC : उद्यान प्रवेशासाठी रोख तिकिटाची सक्ती

ऑफलाईन कामकाजामुळे नागरिकांची मोठी गैरसोय
cash transaction
रोखीने तिकीट Pudhari
Published on: 
Updated on: 

माहिती व तंत्रज्ञान युगातही महापालिकेच्या उद्यान विभागाचे बहुतांश कामकाज ऑफलाईन म्हणजे कागदावरच चालत आहे. उद्यानप्रवेशासाठी नागरिकांना ऑनलाईन तिकिटाऐवजी रोखीने तिकीट काढल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही. ऑफलाईन कामकाजामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असून, त्यांचा वेळही वाया जात आहे.

महापालिकेचा कारभार ऑनलाईन तंत्रज्ञानावर आधारित आहे. त्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. असे असताना उद्यान विभागास ऑनलाईनचे वावडे असल्याचे दिसून येत आहे. उद्यान विभागाचे कामकाज विविध कायद्यानुसार चालते. महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व अधिनियम 1975 नुसार वृक्षसंवर्धनविषयक ना हरकत दाखला देण्यासाठी मानांकनानुसार अनामत रक्कम भरून घेणे, वृक्षगणना व वृक्षारोपणविषयक कामकाजासह उद्यान विभागाचे संपूर्ण कामकाज चालते.

महाराष्ट्र महापालिका अधिनियम 1949 कलम 95, 96 व 100 नुसार उद्यान विभागाचा अर्थसंकल्प तयार केला जातो. आयकर कायदा 1961 नुसार कर्मचार्यांचे आयकर भरले जातात. महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 नुसार अधिकारी व कर्मचार्‍यांना वेतन व रजा मंजूर केल्या जातात. केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये अर्ज व अपिलाचे काम चालते. महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम 1998 नुसार सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचार्‍यांना रक्कम अदा केली जाते. लेखा विभागाच्या परिपत्रकानुसार थेट महाटेंडर वेबसाइटवर निविदा प्रकाशित केली जाते. अशा विविध कायद्यांनुसार उद्यान विभागातील कामे केली जातात.

माहिती तंत्रज्ञान युगातही यातील बहुसंख्य कामे ऑफलाइन पद्धतीनेच केली जात आहेत. वृक्षसंवर्धनविषयक संपूर्ण कामकाज ऑफलाईन चालते. माहिती अधिकार अर्ज व प्रथम अपिलाबाबत संपूर्ण कामकाजही ऑफलाईन होते. वृक्षसंवर्धनविषयक ना हरकत दाखला देणे व त्यासाठी संबंधित मानांकानुसार अनामत रक्कम रोखीने भरून घेतली जाते. विभागाचा अर्थसंकल्पही कागदावर असतो. वृक्षारोपण विषयक संपूर्ण कामकाज, विविध प्रकारचे शुल्क व रकमा स्वीकारणे, फांद्यांची छाटणी व वृक्षतोड, आवक-जावक नोंदी आदी कामे ऑफलाईन पध्दतीने होत आहेत.

रोख रकमेसाठी धावाधाव

उद्यानाचे तिकीट काढण्यासाठी ऑनलाईन सुविधा नाही. कोणताही स्कॅनर वापरला जात नाही. रोखीने पैसे दिल्याशिवाय उद्यानात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे सहकुटुंब व मित्रमंडळींसोबत आलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय होते. ऐनवेळी रोख रक्कम आणण्यासाठी त्यांना धावाधाव करावी लागत आहे.

ऑनलाईन सुविधा देण्यासाठी प्रयत्न

महापालिकेच्या उद्यान व संवर्धन विभागाचे कामकाज नागरिकांच्या सोयीसाठी ऑनलाइन पद्धतीने करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच कामकाज ऑनलाइन सॉफ्टवेअरच्या माध्यमातून केले जाणार असल्याचे उद्यान विभागाचे उपायुक्त उमेश ढाकणे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news