मोशी: नवीन डीपीनुसार आरक्षणांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे चिखली-मोशी परिसरातील नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे. चिखलीमध्ये यापूर्वीच दहा हजार घरांचा (ईडब्ल्यूएस) प्रकल्प साकारलेला आहे.
पुन्हा चिखलीतील पाटीलनगरमधील गट क्र. 1653 आणि गट क्र. 1655 या दोन्ही ठिकाणी ईडब्ल्यूएसचे आरक्षण टाकले आहे. हे आरक्षण रद्द झालेच पाहिजे, अशी चिखलीकरांनी मागणी केली आहे. हे आरक्षण रद्द न झाल्यास आंदोलन करू, असा इशारा चिखली ग्रामस्थांनी दिला आहे. (Latest Pimpri News)
शहरामध्ये सर्वात मोठे ईडब्ल्यूएसचे आरक्षण चिखलीमध्ये विकसित केले आहे. दहा हजार घरांचा हा प्रकल्प आहे. तरीही चिखलीत दोन ईडब्ल्यूएसच्या प्रकल्पाचे आरक्षण टाकले आहे. हे आरक्षण त्वरित रद्द करावे, अशी मागणी प्रशासनाला निवेदन देऊन केली जात आहे. आरक्षण रद्द न केल्यास तीव्र आंदोलन उभारू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
चिखली परिसरामध्ये क्रीडांगण, उद्यान, हॉस्पिटल, जलतरण तलाव या आरक्षणाची गरज आहे. परिसरातील नागरिकांच्या आवश्यकतेनुसार आरक्षण विकसित झालीच नाही. त्यात भर म्हणजे पुन्हा पाटीलनगर चिखली परिसरात ईडब्ल्यूएसचे आरक्षण टाकले. चिखलीकरांवर हा अन्याय आहे. हे ईडब्ल्यूएसचे आरक्षण रद्द झालेच पाहिजे, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाणार आहे.
- जितेंद्र यादव, चिखली ग्रामस्थ.
चिखलीतील ईडब्ल्यूएसचे आरक्षण रद्द करून क्रीडासंकुल उभारावे, अशी आमची मागणी आहे. चिखलीकरांचे राहणीमान उंचाविण्यासाठी क्रीडासंकुल, उद्यान, जलतरण तलाव अशा आरक्षणाचा विकास महत्त्वाचा आहे. ईडब्ल्यूएसचे आरक्षण रद्द करावे, अन्यथा आंदोलन करू.
- कुंदन गायकवाड, माजी नगरसेवक.