

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेने जाहीर केलेल्या नगर रचना योजना अर्थात टीपी (टॉऊन प्लानिंग) स्कीमला चर्होली परिसरातून मोठ्या प्रमाणात विरोध होत असल्याने आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी टीपी स्कीम राबवण्यास तात्पुरती स्थगिती दिली.
मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्यानंतर आयुक्तांनी टीपी स्कीम रद्दचा निर्णय तात्काळ घेतला आहे. त्या निर्णयास सर्वसाधारण सभेचीही मंजुरी देण्यात आल्याने अखेर, टीपी स्कीम रद्द झाल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. (Latest Pimpri News)
महापालिका आयुक्त सिंह यांनी चिखली-कुदळवाडीतील 380 हेक्टर आणि चर्होलीतील पाच भागांत एकूण 1 हजार 425 हेक्टर क्षेत्रावर टीपी स्किम राबविण्याचा निर्णय 1 मे रोजी जाहीर केला. अचानकपणे आणलेल्या टीपी स्कीमला तीव्र विरोध झाल्याने दुसर्याच आठवड्यात आयुक्तांनी केवळ चिखली येथील टीपी स्कीम रद्द करण्याचा निर्णय 14 मे रोजी घेतला.
त्याला सर्वसाधारण सभेची मान्यता दिली. मात्र, चर्होलीत टीपी स्कीम राबविण्याचा निर्णय कायम ठेवला. चर्होलीतील विरोध वाढल्याने आयुक्तांनी नागरिक व लोकप्रतिनिधींच्या विरोधाचे कारण देत ही कार्यवाही स्थगित केल्याचे शहराबाहेर असताना 30 मे रोजी जाहीर केले.
दरम्यान, ही तात्पुरती स्थगिती देत, जैसे थे स्थिती प्रशासनाने निर्माण केली. प्रत्यक्षात चिखलीप्रमाणे सर्वसाधारण सभेत टीपी स्कीम रद्द करण्याचा कोणताही ठराव केला नाही. काही दिवसात हा ठराव होईल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. मात्र, त्याबाबत काही हालचाली होत नसल्याने चर्होलीतील नागरिकांमध्ये संभ्रम होता. टीपी स्कीम रद्द कधी होणार, अशी विचारणा केली जात होती. महापालिका प्रशासनाकडून वेळकाढूपणा काढला जात असल्याने नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.
या संदर्भात चिखली येथील बुधवार (दि.18) झालेल्या महापालिकेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांना नागरिकांनी मागणीचे निवेदन दिले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना चर्होलीचा टीपी स्कीम रद्द करण्याचे आदेश जाहीरपणे दिले.
आयुक्तांनी त्याच दिवशी सर्वसाधारण सभा घेत चर्होली टीपी स्कीम रद्दचा निर्णय घेतला. जमीन मालकांकडून तीव्र विरोध होत असल्याने हा निर्णय घेतल्याचे आयुक्तांनी ठरावात नमूद केले आहे. टीपी स्कीम रद्दवर अखेर शिक्कामोर्तब झाल्याने चर्होलीतील नागरिकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.
ग्रामस्थांच्या लढ्यास यश
चर्होलीतील जमीन मालक, शेतकरी व ग्रामस्थांनी दिलेल्या लढास यश आले आहे. महापालिकेने स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेता कोणताही निर्णय परस्पर लादू नये. टीपी स्कीम रद्दसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार महेश लांडगे तसेच, आयुक्त शेखर सिंह यांनी सहकार्य केल्याने आम्ही त्यांचे आभारी आहोत, असे माजी महापौर नितीन काळजे यांनी सांगितले.