

पिंपरी: आपल्या आईवर करणी केल्याच्या रागातून पुतण्यासह अल्पवयीन मुलाने चुलतीला आणि चुलत भावाला शिवीगाळ करत तलवार उगारली. ही घटना बुधवारी (दि. 1) रात्री साडेआठच्या सुमारास भोसरी येथील महात्मा फुलेनगरमध्ये घडली.
दिव्या अनिल कसबे (34, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुतण्या आमन विकास कसबे (20, रा. महात्मा फुलेनगर) आणि एका 17 वर्षीय मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आपल्या मुलीला आणण्यासाठी गेली असताना त्यांची जाऊ उज्ज्वला कसबे हिने तुझ्या नवऱ्याने माझ्यावर करणी केली आहे, असे म्हणून वाद घातला. या वेळी आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या मुलाला शिवीगाळ करत मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या वेळी अल्पवयीन मुलाने घरातून तलवार आणून फिर्यादीच्या मुलावर उगारली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. तपास एमआयडीसी भोसरी पोलिस करत आहेत.