दापोडी पोलिसांसमोर झोपडपट्टी दादांचे आव्हान

भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीचे विभाजन करून नवीन पोलीस ठाणे
Dapodi Police Station
दापोडी पोलिसांसमोर झोपडपट्टी दादांचे आव्हानPudhari
Published on
Updated on

Pimpri News: पंचेचाळीस चौरस किलोमीटरपेक्षा जास्त मोठी हद्द असलेल्या भोसरी पोलीस ठाण्याचे विभाजन करून दापोडी हे नवीन पोलीस ठाणे कार्यान्वित करण्यात आले आहे. कासारवाडी आणि यापूर्वी दापोडी चौकीअंतर्गत असलेला भाग नवीन या ठाण्याच्या अंतर्गत असणार आहे.

दापोडी ठाण्यामुळे नागरिकांची पायपीट थांबणार आहे. हद्दीत झोपडपट्टीसह संमिश्र लोकवस्तीचा भाग आहे. त्यामुळे झोपडपट्टी दादांच्या मुसक्या आवळण्याचे मोठे आव्हान दापोडी पोलिसांसमोर असणार आहे. (Latest Marathi News)

पिंपरी-चिंचवड शहरासाठी 15 ऑगस्ट 2018 रोजी स्वतंत्र आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली. यामध्ये पुणे ग्रामीणच्या कार्यक्षेत्रातील 5 आणि पुणे शहर यांच्या कार्यक्षेत्रातील 10 पोलीस ठाणी आयुक्तालयात वर्ग करण्यात आली. दरम्यान, शहराची वाढती लोकसंख्या, कायदा व सुव्यवस्थेचे निर्माण होणारे प्रश्न आदी बाबींचा विचार करून रावेत, शिरगाव आणि महाळुंगे अशी तीन ठाणी यापूर्वी सुरुवात करण्यात आली.

सद्यस्थितीला आयुक्तालयात एकुण 18 पोलीस ठाणी कार्यान्वित आहे. याव्यतिरिक्त नुकतेच काळेवाडी, दापोडी, संत तुकाराम नगर आणि बावधन पोलीस ठाणी कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे आयुक्तालयाच्या अखत्यारीत एकूण 22 पोलीस ठाणी झाली आहेत.

यातील दापोडी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत झोपडपट्टी आणि संमिश्र लोकवस्तीचा भाग वर्ग करण्यात आला आहे. या भागात शरीराविरुद्ध घडणार्‍या गुन्ह्यांचे प्रमाण अधिक आहे. रेकॉर्डवर असलेल्या झोपडपट्टी दादांना कायद्याचे भय वाटत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आगामी काळात झोपडपट्टी दादांची दहशत मोडून काढण्याचे मोठे आव्हान दापोडी पोलिसांसमोर असणार आहे.

भोसरी पोलीस ठाण्यावरील ताण हलका

भोसरी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत इंद्रायणीनगर, सद्गुरुनगर, लांडेआळी, धावडेवस्ती, चक्रपाणी वसाहत, सिद्धार्थनगर, आनंदवन, पवारवस्ती, गुलाबनगर, बोपखेल गाव, सीएमई, गुलीस्ताननगर यासह औद्योगिक परिसर येत होता.

संमिश्र लोकसंख्या, औद्योगिक वसाहती, बाजारपेठा, धार्मिक स्थळे, सरकारी कार्यालये व सी.एम.ई. (कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरींग) यासारख्या महत्त्वाच्या आस्थापना येत होत्या. सुमारे 45 चौरस किलोमीटरपेक्षा जास्त अंतरापर्यंत ठाण्याचे कार्यक्षेत्र विखुरले होते. ज्यामुळे गुन्हेगारांवर वॉच ठेवणे शक्य नव्हते.

मात्र, आता भोसरी पोलीस ठाण्याचे विभाजन करून दापोडी आणि कासारवाडी पोलीस चौकीची हद्द एकत्र करून दापोडी पोलीस ठाणे सुरू करण्यात आले आहे. ज्यामुळे भोसरीवरील ताण हलका झाला आहे.

तात्काळ प्रतिसाद शक्य

यापूर्वीच्या भोसरी पोलीस ठाण्याचा पूर्व पश्चिम विस्तार एकूण 8.5 किलोमीटर एवढा असून दक्षिण-उत्तर विस्तार हा 5 किलोमीटर इतका होता. दापोडी पोलीस चौक ते बोपखेल हे अंतर सुमारे 14 किलोमीटर आहे. फुगेवाडी, दापोडी, कासारवाडी, धावडे बस्ती, लांडेवाडी, भोसरी, रामनगर या परिसरातील नागरिकांना तक्रार देण्यास येण्यासाठी सुमारे 6 ते 7 किमी अंतर कापावे लागत होते.

या भागात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास तात्काळ पोलीस मदत पोहचत नव्हती. मात्र, आता दापोडी पोलीस ठाणे सुरू झाल्याने नागरिकांना तात्काळ प्रतिसाद मिळणे शक्य होणार आहे.

दापोडी पोलीस ठाण्यासाठी मनुष्यबळ

पोलीस निरीक्षक - 2

सहायक निरीक्षक - 3

उपनिरीक्षक - 9

सहायक उपनिरीक्षक - 9

पोलीस हवालदार - 23

पोलीस शिपाई - 45

अशी आहे दापोडी ठाण्याची हद्द

सिद्धार्थ कॉलनी, एसएमएस कॉलनी, केशवनगर (कासारवाडी), महात्मा फुलेनगर, गणेशनगर (दापोडी), कुंदननगर (कासारवाडी), जयभीमनगर, गुलिस्ताननगर, महाराष्ट्र चौक (कासारवाडी), पाच बंगला परिसर, सीएमई दापोडी, फोरेशीया कंपनी व मेनगेट, पवारवस्ती, संजयनगर (फुगेवाडी), सीआयआरटीचे कार्यालय व लगत सयाजी काटे यांची शेती, गुलाबनगर, आनंदवन (फुगेवाडी), आरटीओ सेंटर, दापोडी गावठाण, नाशिक फाटा (कासारवाडी), कलासागर हॉटेल (कासारवाडी), बॉम्बे कॉलनी, शास्त्रीनगर (कासारवाडी)

दक्षिणेस - सीआयआरटी इन्टिट्यूटची संरक्षक भिंत व कलासागर हॉटेल

पूर्वेस - कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी, हॅरीष ब्रीज, पवनानदी किनारालगत

उत्तरेस - सीएमई संरक्षक भिंत

पश्चिमेस - एमएसईबी संरक्षक भिंत

भोसरी पोलीस ठाण्याची हद्द मोठी होती त्यामुळे पोलिसांना घटनास्थळी वेळेत पोहचणे शक्य होत नव्हते. दरम्यान, नागरिकांना तत्काळ प्रतिसाद मिळावा, यासाठी दापोडी पोलीस ठाण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. शासनाने मंजुरी दिल्याने आता दापोडी पोलीस ठाणे सुरू करण्यात आले आहे. हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. झोपडपट्टी परिसराकडे विशेष लक्ष असणार आहे.

- निलेश वाघमारे, वरिष्ठ निरीक्षक, दापोडी पोलिस ठाणे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news