वेटिंग पिरियड असलेली गाडी लवकर मिळवून देतो, तसेच कमी किंमतीत किंवा गाडीसोबत अॅक्सेसरीज फ्री मिळवून देतो, असे आमिष दाखवून जर कोणी स्वतःच्या नावावर गाडीची बुकिंगची रक्कम घेत असेल, तर जरा सावध व्हा... कारण, मागील काही दिवसांपासून बुकिंग रक्कम स्वतःच्या खात्यावर स्वीकारून फसवणूक केल्याचे प्रकार समोर आले आहेत. यातील विशेष बाब म्हणजे घडलेल्या या प्रकाराबाबत शोरूम व्यवस्थापनाने हात वर केले आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे.
शोरूममध्ये काम करणार्या कन्सलटंटने वरिष्ठांच्या परवानगीशिवाय ग्राहकाकडून पैसे स्वीकारले. तसेच, गाडीची परस्पर ग्राहकाला डिलिव्हरी देत फसवणूक केली. याप्रकरणी राहुल खांदवे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीने ग्राहकाला महागडी कार विकली.यातील काही रक्कम आरोपीने स्वतःच्या खात्यावर घेत फसवणूक केली.
डाऊन पेमेंट पळवले
ग्राहकाने डाऊनपेमेंट म्हणून दिलेल्या तीन लाख रुपयांचा शोरूममधील सेल्स मॅनेजरने अपहार केला. याप्रकरणी प्रशांत मुरलीधर ठाकरे (32, रा. ताथवडे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे कार खरेदी करण्यासाठी भूमकर चौक येथील नेक्सा शोरूम मध्ये गेले. त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांना ’आज चार लाख रुपये डाऊनपेमेंट केल्यास उद्या गाडी भेटेल’ असा विश्वास दाखवला. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांना स्वत:च्या बँक खात्यावर तीन लाख रुपये भरण्यास भाग पाडले. पैसे दिल्यानंतर आरोपीने त्या रकमेचा स्वतःच्या फायद्यासाठी अपहार केला.
अनेकांना नाहक भुर्दंड
ग्राहकांची फसवणूक केल्यानंतर शोरूमकडून संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी देखील गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. काही प्रकरणात ग्राहकांना माघारी पैसे मिळाले. मात्र, बहुतांश जणांना नाहक भुर्दंड सोसावा लागला आहे.
अशी होते फसवणूक
काही नामांकित वाहन कंपन्यांच्या ठराविक मॉडेलला मागणी जास्त असते. त्यामुळे संबंधित वाहनाचे मॉडेल मिळवण्यासाठी कंपनी ’वेटिंग पिरियड’ निश्चित करून देते. याचा फायदा घेत संबंधित शोरूममधील काही सेल्समन ग्राहकांना वेटिंग पिरीयड असलेली गाडी लवकर मिळवून देतो, असे सांगतात. त्यासाठी जास्तीची रक्कम स्वतःच्या बँक खात्यावर घेतली जाते. याबाबत शोरूम व्यवस्थापन अनभिज्ञ असते. यासह काही सेल्समन कमी किंमतीत गाडी मिळवून देणे, गाडीसोबत अॅक्सेसरीज मिळवून देण्याचे आमिष दाखवून ग्राहकाकडून पैसे उकळतात.
वैयक्तिक खात्यावर नकोत व्यवहार
वाहन खरेदी करताना तेथील सेल्समनच्या सांगण्यानुसार वैयक्तिक खात्यावर बुकिंग रक्कम पाठवू नये. बुकिंग रक्कम ही कंपनीच्या नावेच जाणे गरजेचे आहे. तसेच, बुकिंग रक्कम दिल्यानंतर शोरूमकडून याबाबतची पावती घ्यावी. जेणेकरून भविष्यात होणारी फसवणूक टाळता येणे शक्य होणार आहे.