पुणे : दररोज सायबर हल्ल्याच्या सात हजारांहून अधिक तक्रारी देशभरात दाखल होत आहेत. ठगांनी नागरिकांच्या खिशातून ३ अब्ज डॉलर काढून नेले आहे. स्पॅम कॉल आणि एसएमएसला बळी पडणाऱ्या नागरिकांना लगेचच अलर्ट जाणार आहे.
एअरटेलने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) मदतीने स्पॅमचा तोडगा काढला आहे. अशी सुविधा देणारी एअरटेल देशातीलच नव्हे, तर जगातील पहिली कंपनी ठरली आहे. ग्राहक हितासाठी ही सुविधा पूर्णपणे मोफत असल्याची माहिती भारती एअरटेलचे महाराष्ट्र आणि गोव्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉर्ज मथेन यांनी गुरुवारी (दि.३) पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्रातील ३.३ कोटी ग्राहकांसह देशभरातील एअरटेलच्या ग्राहकांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे. एआयच्या मदतीने दीड अब्ज एसएमएस, अडीच अब्ज मोबाईल कॉलवर अवघ्या दोन मिलीसेकंदात प्रतिक्रिया देण्याची क्षमता आहे.
मथेन म्हणाले, एआयच्या मदतीने रोबोने केलेले आणि प्रत्यक्ष सायबर चोरट्यांनी केलेले कॉल शोधता येतात. कॉल आणि मेसेज कोणत्या मोबाईलवरून सातत्याने केले जात आहेत, एखाद्या मोबाईलवरून केवळ कॉल लावले जातात आणि कॉल येतच नाहीत अशा नंबरचा शोध घेतला जातो.
एखादी व्यक्ती हरियाणातून देशभरात सातत्याने कॉल लावत असल्यास अशा क्रमांकाकडेही लक्ष ठेवले जाते. मोबाईल फोन आणि सीमकार्ड सातत्याने बदलण्याच्या प्रवृत्तीवरही प्रणाली लक्ष ठेवून असते. अशा प्रकारच्या अडीचशेहून अधिक संशयास्पद हालचाली अवघ्या दोन मिलीसेकंदात शोधल्या जातात.