

पिंपरी: वाहतूक कोंडीतून पुणेकरांना बाहेर काढण्याच्या दृष्टीने सोमवारी (दि. 3) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अनधिकृत बांधकाम व निर्मूलन विभागासह इतर शासकीय यंत्रणांच्या सहकार्याने 201 अतिक्रमणे हटविली.
अतिक्रमण हटाव मोहिमेच्या पहिल्याच दिवशी तीन प्रमुख मार्गावर सकाळपासून कारवाईचा धडाका सुरू होता. त्यामुळे विविध भागातील एकूण 20 हजार चौरस फुटांपेक्षा अधिक अतिक्रमणांवर दिवसभरात हातोडा पडला.
पुणे शहराभोवती असणार्या राष्ट्रीय आणि राज्यमार्गावर होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी संबंधित भागात आगामी 30 दिवसांत रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेले अनधिकृत व अतिक्रमित दुकाने, गाळे, बांधकामे आदींवर लक्ष्य करण्यात येत आहे. त्याला अनुसरून पीएमआरडीए, पुणे महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, स्थानिक पोलिस विभाग, एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम विभागासह इतर विभागाने संयुक्त कारवाईसाठी वेळापत्रक निश्चित केले आहे.
त्यानुसार, ही कारवाई केली. पुणे-नाशिक महामार्गावरील इंद्रायणी नदी ते बर्गे वस्ती भागात - 78, पुणे-सोलापूर महामार्गावर - 70 तर चांदणी चौक- पौड रस्त्याच्या दोन्ही बाजूची एकूण 53 अतिक्रमणे हटविली.
ही कारवाई महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस अधीक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहआयुक्त डॉ. दीप्ती सूर्यवंशी- पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कार्यकारी अभियंता शैलेजा पाटील, पुणे महापालिकेचे कार्यकारी अभियंता सदानंद लिटके यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी या कारवाईत भाग घेतला.
महामार्ग, राज्यमार्गाच्या रस्त्यालगतची दुकाने, पत्राशेड, गाळे, टपरी यांचे अतिक्रमण तसेच अनधिकृत बांधकामे संबंधित नागरिकांनी स्वतः काढून घ्यावी, असे आवाहन पीएमआरडीएने केले आहे. नागरिकांसह वाहनधारकांच्या अडचणी सोडविण्यासाठी महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी गेल्या आठवड्यात पीएमआरडीए कार्यालयात विविध यंत्रणेच्या अधिकार्यांची संयुक्त बैठक घेतली होती. तसेच, कारवाईचे निर्देश दिले होते.