महाविद्यालयात विद्यापीठ शुल्क फलकांचा अभाव
वर्षा कांबळे
पिंपरी : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील सर्व शासकीय, अकृषी, खासगी व अभिमत विद्यापीठ यांनी सर्व अभ्यासक्रमासाठी निश्चित केलेल्या सर्व शैक्षणिक शुल्कांची माहिती महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर तसेच आवारातील माहिती फलकावर लावणे बंधनकारक आहे
मात्र काही अपवाद सोडता शहरातील अनेक महाविद्यालयांत फलकच दिसून येत नाही, तर काही महाविद्यालयांत फलकांवर शुल्काबाबत माहिती लिहिण्यास टाळाटाळ केली जात आहे, असा आरोप विद्यार्थी संघटनांकडून होत आहे.
शुल्क भरण्याचा तगादा
उच्च व तंत्र शिक्षण विभागात पदवीपूर्व व पदवीत्तर अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या खुला व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना राज्य व केंद्र सरकारची शिष्यवृत्ती मिळते. या अभ्यासक्रमांना मागासवर्गीय प्रवर्गासोबतच विद्यार्थ्यांना राजश्री छत्रपती शाह महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती शिष्यवृत्ती योजना लागू आहेत.
त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे महाविद्यालयांना सरकारकडून मिळतात; मात्र कॉलेज प्रशासन विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना संपूर्ण शुल्क भरण्याचा तगादा लावत असल्याचे चित्र आहे.
काही महाविद्यालयांकडून वाढीव फी वसूल
अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संबंधित विद्यापीठाने ठरवलेल्या दराप्रमाणे शिक्षण शुल्क, प्रयोगशाळा शुल्क, ग्रंथालय शुल्क, इतर शुल्क, नोंदणी शुल्क, कॉम्प्युटर प्रॅक्टिकल शुल्क व परीक्षा शुल्क याची महाविद्यालयाला प्रतिपूर्ती करण्याच्या सूचना जून २००५ रोजीच्या शासन परिपत्रकान्वये देण्यात आल्या होत्या.
राज्यातील सर्व शासकीय, अकृषी, खासगी व अभिमत विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातील खुला व मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून पदवीपूर्व व पदवीत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतेवेळी विद्यापीठ व शुल्क नियामक प्राधिकरणाने निश्चित केलेले शुल्क आकारणे बंधनकारक असताना काही अपवाद सोडता अनेक महाविद्यालयांनी वाढीव फी वसूल केली आहे.
माहिती प्रसिद्ध करण्याची मागणी
राज्यातील सर्व शासकीय, अकृषी, खासगी व अभिमत विद्यापीठ यांनी सर्व अभ्यासक्रमासाठी निश्चित केलेल्या सर्व शुल्काची माहिती सर्व विद्यापीठ व महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर व विद्यापीठ व महाविद्यालयाच्या माहिती फलकावर तात्काळ प्रसिद्ध करावी, अशी मागणी कॉप्स संघटनेचे अध्यक्ष अमर एकाड यांनी केली आहे.
विद्यापीठाने मंजूर केलेल्या शुल्काची माहिती संकेतस्थळ आणि नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करावीत असे परिपत्रक नुकतेच काढण्यात आले आहे. त्यानुसार सर्व विद्यापीठ, अभिमत विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी शुल्काची माहिती प्रसिद्ध करावी, अशी सूचना करण्यात आली आहे. - डॉ. शैलेंद्र देवळाणकर (प्रभारी उच्च शिक्षण संचालक)

