

पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या अर्जांची छाननी बुधवारी (दि.30) करण्यात आली. त्यात एकूण 13 जणांचे अर्ज बाद झाले. तर, एकूण 82 जणांचे अर्ज वैध ठरले. चिंचवड मतदारसंघातील विद्यमान आमदार अश्विनी जगताप, भोसरीतून पूजा लांडगे, माजी नगरसेवक मारूती भापकर यांचा अर्ज अपात्र ठरला आहे. पिंपरी विधानसभेत छाननीदरम्यान गोंधळ झाल्याने सायंकाळी उशिरापर्यंत अर्जांची छाननी सुरू होती.
पिंपरी मतदारसंघातून 39 जणांपैकी 3 जणांचे अर्ज बाद झाले आहेत. तर, 36 जणांचे अर्ज वैध ठरले आहेत. अपक्ष कैलास बनसोडे, लक्ष्मण शिरोळे, बाबा बाळू कांबळे यांचे अर्ज अपात्र ठरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांच्या उमेदवारी अर्जातील प्रतिज्ञापत्रावर आक्षेप नोंदविला गेल्याने त्यांच्या अर्ज छाननीवरून काही काळ गोंधळ उडाला होता
चिंचवड मतदारसंघात 32 जणांनी उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 4 जणांचे अर्ज बाद ठरले. तर, 28 जणांचे अर्ज पात्र ठरले आहेत. भाजपाच्या विद्यमान अश्विनी जगताप यांचा अर्ज बाद झाला. तसेच, अपक्ष आनंद मोळे, जितेंद्र वाडघरे, जसविंदर सिंग रत्तू असे चार जणांचे अर्ज बाद करण्यात आले. त्यामुळे रिंगणात आता 28 जण राहिले आहेत.
भोसरी विधानसभा मतदारसंघात 24 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 6 जणांचे अर्ज बाद झाले आहेत. तर, 18 जणांचे अर्ज वैध ठरले आहेत. भाजपाचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्या पत्नी पूजा लांडगे, माजी नगरसेवक मारुती भापकर यांचा अर्ज बाद करण्यात आला आहे. तसेच, अपक्ष राहुल नेवाळे, ज्ञानेश्वर बोराटे, प्रकाश डोळस, विकासराजे केदारी असे एकूण 6 जणांचे अर्ज अपात्र ठरले.
पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांनी आपल्या अर्जात शासनाचे दायित्व नसल्याबाबतचे तसेच, शासकीय निवासस्थानाचे देणे येणे नसल्याबाबत व अर्जांमधील सर्व रकाने भरले नाहीत. असा आक्षेप प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार चंद्रकांता सोनकांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुलक्षणा शीलवंत-धर, अपक्ष उमेदवार चंद्रकांत लोंढे, मनोज कांबळे, जितेंद्र ननावरे यांनी घेतला होता. निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी ते आक्षेप फेटाळला. छाननीत आ. बनसोडे यांचा अर्ज वैध असल्याचे त्यांनी घोषित केले. त्यामुळे छाननी प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. त्यामुळे काही काळ वातावरण तणाव पूर्ण झाले होते.
पिंपरी : कैलास बनसोडे, लक्ष्मण शिरोळे, बाबा बाळू कांबळे या 3 जणांचे अर्ज बाद झाले. आता रिंगणात 36 जणांचे अर्ज शिल्लक आहेत.
चिंचवड : विद्यमान आमदार अश्विनी जगताप, आनंद मोळे, जितेंद्र वाडघरे, जसविंदर सिंग रत्तू या 4 जणांचे अर्ज बाद झाले. रिंगणात 28 जणांचे अर्ज आहेत.
भोसरी : आमदार महेश लांडगे यांच्या पत्नी पूजा लांडगे, माजी नगरसेवक मारुती भापकर, राहुल नेवाळे, ज्ञानेश्वर बोराटे, प्रकाश डोळस, विकासराजे केदारी या 6 जणांचे अर्ज बाद झाले. रिंगणात 18 जणांचे अर्ज आहेत.