

A speeding container killed a policeman on duty
वडगाव मावळ : मुंबई पुणे महामार्गावर वडगाव तळेगाव फाटा येथे वाहतूक नियंत्रणासाठी ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचार्याचा भरधाव आलेल्या अज्ञात कंटेनरखाली चिरडून मृत्यू झाला. या अपघातात वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी मिथून धेंडे यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. (pimpari chinchwad news)
पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास मुंबई बाजूकडून वेगाने आलेला एका अज्ञात कंटेनरने पोलीस कर्मचारी मिथून धेंडे यांना धडक दिली आणि भरधाव चाकण बाजूकडे निघून गेला. संबंधित कंटेनर चालक हा कार्ला फाट्यापासूनच भरधाव व चुकीच्या पद्धतीने कंटेनर चालवत होता, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी दिली.
वडगाव मावळ व तळेगाव दाभाडे या दोन शहरांना जोडणार्या वडगाव तळेगाव फाटा येथे मुंबई पुणे महामार्ग दक्षिणेकडे द्रुतगती महामार्गाकडे जाणारा रस्ता व उत्तरेकडे चाकणकडे जाणारा रस्ता आहे. सर्वच बाजूंनी सतत वाहतूक सुरू असल्याने या फाट्यावर वाहतूक कोंडी हा नित्याचाच प्रश्न बनला आहे.
मुंबईहून चाकणकडे जाणार्या अवजड वाहण्याची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे वाहतूक नियंत्रणासाठी वडगाव मावळ पोलीस ठाणे अंतर्गत या फाट्यावर पोलीस चौकी उभारण्यात आली असून, त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी मिथून धेंडे हे कार्यरत होते. आजही ते वाहतूक नियंत्रणाची आपली ड्युटी सांभाळत असताना रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास भरधाव आलेल्या या अज्ञात कंटेनरने त्यांना धडक दिली.
या अपघातात त्यांचा बळी गेला. या अपघातानंतर धेंडे यांना तात्काळ पवना हॉस्पिटल सोमाटणे येथे हलवण्यात आले परंतु त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूने पोलीस प्रशासनासह संपूर्ण मावळ तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.