

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने थेरगाव रुग्णालयासमोरील मोकळ्या जागेत कॅन्सर (कर्करोग) रुग्णालय पीपीपी (सार्वजनिक खासगी भागीदारी) तत्त्वावर उभारण्यात येणार आहे. येत्या दोन वर्षांत रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण करुन ते सुरू करण्यात येणार आहे. संबंधित ठेकेदाराला महापालिका खर्चाची निम्मी रक्कम म्हणून 60 कोटी 6 लाख रूपये देणार असून, ते 30 वर्षे रुग्णालय चालविणार आहेत. त्या खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची गुरूवारी (दि.22) मान्यता दिली आहे.
गेल्या काही वर्षांत कॅन्सरग्रस्त रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयांत रुग्णांसाठी उपचाराची सोय उपलब्ध नाही. त्यामुळे महापालिकेने कॅन्सर रुग्णालय उभारण्याचे नियोजन केले आहे. शहरातील गोरगरीब व सर्वसामान्य कॅन्सरग्रस्त रुग्णांना अल्प दरात उपचार मिळावेत, या उद्देशाने हे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचे एक पथक सुरत शहरातील पीपीपी तत्त्वावर सुरू असलेल्या रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यानंतर त्याबाबतचा अहवाल सादर करण्यात आला.
थेरगाव येथील रुग्णालय आणि शंकर गावडे कामगार भवनाच्यामध्ये 35 गुंठे रिकामी जागा आहे. या जागेत डिजाईन, बिल्ड, फायन्यास, ऑपरेट, ट्रान्सफर (डीबीएफओएफ) तत्त्वावर 100 बेडचे कॅन्सर रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. त्यामध्ये 30 वर्षांसाठी रुग्णालय बांधून ते चालवायचे आहे. त्यासाठी 24 सप्टेंबर 2024 ला 143 कोटी रूपये खर्चाची वायबिलिटी गॅप फंड प्रकाराची निविदा काढण्यात आली. त्यामध्ये केवळ एकाच ठेकेदार संस्थेने सहभाग नोंदवला. त्या एकमेव ठेकेदार संस्थेला पात्र ठरविण्यात आले आहे.
आपुलकी हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदार संस्थेने 60 कोटी 6 लाख रुपयांचा दर सादर केला. त्यानुसार, महापालिकेने ही रक्कम दिल्यानंतर बाकी सर्व खर्च संबंधित संस्थेने करायचा आहे. तसेच, रुगणालय सुरू झाल्यानंतर महापालिकेने ठरवून दिलेल्या दरानुसारच रुग्णांकडून पैसे आकारावे लागणार आहेत. येत्या दोन वर्षांत रुग्णालय सुरू करण्यात येणार असून, यामुळे शहरातील गोरगरीब व सर्वसामान्य रुग्णांची सोय होणार आहे, असा दावा महापालिकेने केला आहे.
अकरा मजली इमारतीचे बांधकाम ठेकेदार संस्था करणार आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आवश्यक वैद्यकीय यंत्रसामुग्री संस्था उपलब्ध करून देणार आहे. त्यात अद्ययावत असे प्रकाराचे वैद्यकीय उपचारासाठी लागणारे मशिनरी व साहित्य असणार आहेत. तसेच, वैद्यकीय डॉक्टर, परिचारिका, वॉर्ड बॉय व इतर तांत्रिक असे सर्व प्रकारचे मनुष्यबळ तेच पुरविणार आहेत. इमारत बांधण्यासाठी दोन वर्षांची मुदत आहे. त्यानंतर 28 वर्षे ते रूग्णालय चालवतील. त्यांना महापालिका दोन वर्षांत एकूण 60 कोटी रूपये देणार आहे. ती रक्कम 25 टक्के हप्तानुसार चार टप्प्यात दिली जाणार आहे. इमारत पूर्ण होऊन रुग्णांवर उपचार सुरू झाल्यानंतर शेवटचा 25 टक्के हप्ताची रक्कम देण्यात येणार आहे. त्यानंतर महापालिका त्यांना कोणताही निधी देणार नाही.