इन्स्टाग्रामवर रिल्स पाहात असलेल्या एका व्यक्तिने आलेल्या लिंकला क्लिक केल्यानंतर, परस्पर एका ग्रुपमध्ये जोडले. त्यानंतर स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यास भाग पाडून 50 लाखांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 17 जुलै ते 23 नोव्हेंबरदरम्यान बावधन येथे घडली. आरोपींविरोधात सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी पराग अशोक वाधोने (48, रा. बावधान) हे रिल्स पाहत असताना आरोपींनी लिंकद्वारे त्यांना एका ग्रुपला अॅड केले. त्यानंतर स्टॉक मार्केटमध्ये 50 लाख 77 हजार 600 रुपये गुंतविण्यास भाग पाडले. ही रक्कम फिर्यादी काढण्यास गेल्यावर सदर रक्कम स्टॉक्समध्ये गुंतवल्याचे आरोपींनी सांगितले. त्यानंतर पुन्हा आरोपींनी 20 लाख 72 हजार 490 रुपयांची मागणी केली. मात्र, अद्यापपर्यंत फिर्यादीस गुंतवलेली रक्कम आणि नफा मिळाला नाही. त्यामुळे झालेल्या फसवणुकीविरोधात फिर्यादीने सायबर पोलिसांत फिर्याद दिली.
सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वापरामुळे फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी ऑनलाईनद्वारे आलेल्या मॅसेजकडे दुर्लक्ष करून, त्यांच्या प्रलोभनांना बळी न पडता, सेबी रजिस्टर स्टॉक ग्रुपमध्येच खात्री करून पैशांची गुंतवणूक करावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

