पिंपरी : चिखली, कुदळवाडी भागातील अनधिकृत बांधकामे व पत्राशेडवर महापालिकेकडून कारवाई सुरूच आहे. अतिक्रमणविरोधी कारवाईत बुधवारी (दि.12) 93 एकर परिसरातील 528 अनधिकृत बांधकामे व पत्राशेड पाडण्यात आली. गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेल्या या कारवाईत एकूण 465 एकर भाग अतिक्रमणमुक्त करण्यात आला आहे.
अतिक्रमणविरोधी कारवाई शनिवारी (दि.8) सुरू करण्यात आली होती. ती अद्याप कायम आहे. भंगार दुकाने, गोदामे, कारखाने आणि इतर अनधिकृत बांधकामे व पत्राशेड हटविण्याची मोहीम महापालिकेकडून सुरू आहे. कारवाईत अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उपायुक्त मनोज लोणकर, राजेश आगळे, क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे, अमित पंडित, किशोर ननवरे, महेश वाघमोडे, अजिंक्य येळे, शीतल वाकडे, श्रीकांत कोळप यांच्यासह कार्यकारी अभियंते, उपअभियंते आणि कर्मचारी सहभागी झाले. पोलिस सहआयुक्त शशिकांत महावरकर, अतिरिक्त पोलिस आयुक्त वसंत परदेशी यांच्या नियंत्रणाखाली पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.
महापालिका आणि पोलिस प्रशासनाकडून कुदळवाडी येथे डीपी आरक्षण जागेतील अतिक्रमणे हटविण्यात येत आहेत. यापुढेही ही कारवाई सुरूच राहणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी सांगितले.