नव्या वाहनाची खरेदी केल्यावर आवडणारा क्रमांक घेण्यासाठी शहरातील नागरिकांनी पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागात साडेसत्तवीस कोटी रुपये रुपये यावर्षीच्या पहिल्या दहा महिन्यांत मोजले आहेत. दिवाळी सणात हौसेखातर एकाने क्रमांक एकसाठी अठरा लाख रुपये भरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
वाहनाच्या एकमेव क्रमांकावरून आपली पत राखणारी मंडळी तसेच काहींसाठी लकी नंबर तर काहींनी ज्योतिषाच्या सांगण्यावरून आपल्या वाहनांसाठी नंबर मिळविला आहे. आरटीओमध्ये चॉईस नंबरसाठी यावर्षी 26 हजारांहून अधिक अर्ज दाखल करण्यात आले आहेत. आवडीच्या क्रमांकापैकी 001, 7, 9, 12, 007, 99, 999, हे क्रमांक मिळविण्यासाठी नागरिकांनी अधिक प्रमाणात अर्ज दाखल केले आहेत. शुभ मुहुर्तावर वाहनांची खरेदी करणे ही प्रथा असल्याने अनेकांच्या घरी दसरा आणि दिवाळीत नवी वाहने दिसून येतात. या वाहनांना आपल्या पसंतीचा क्रमांक मिळावा यासाठी अनेकजण लाखो रुपये मोजतात. या सणासुदीच्या काळात महिनाभरात साडेसहा कोटी रुपये चॉईस नंबरसाठी नागरिकांनी भरले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरातील एका कोट्याधिशाने दिवाळीमध्ये इंपोरर्टेड गाडी रोल्स रॉयसची खरेदी केली. या धनाधिशाने आपल्या पसंतीच्या असलेल्या 001 क्रमांकासाठी तब्बल अठरा लाख रुपये मोजल्याची अचंबित करणारी माहिती समोर आली आहे.
अनेकांना 09 क्रमांकाचे अधिक क्रेझ आहे. त्याच आकड्यानुसार 99, 999, 9999 हा क्रमांक मिळविण्यासाठी नागरिकांची अधिक पसंती आहे. आरटीओची नवी सीरिज सुरू झाल्यावर या क्रमांकासाठी अनेकजण लाखो रुपये मोजतात.
पसंतीच्या क्रमांकासाठी अनेकांनी अर्ज दाखल केले. मात्र मोजक्याच जणांना आवडीचे क्रमांक मिळतात. राज्याच्या गृह विभागाकडून पसंतीच्या क्रमांकाचा दर ठरविला जातो. त्यानुसार, नागरिकांकडून दराची आकारणी केली जाते. 13 ते 31 ऑक्टोबर या दिवसांत चॉईस नंबरसाठी पिंपरी-चिंचवडकरांनी शासनाच्या खात्यात 39 लाख 4 हजार 500 रुपये भरले आहेत.
यावर्षी जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांत 26 हजार 712 अर्ज पसंतीच्या वाहनासाठी आरटीओमध्ये दाखल झाले. याद्वारे शासनाच्या खात्यात एकूण 27 कोटी 62 लाख 38 हजार 500 रुपयांचा महसूल जमा झाला आहे.
ऑक्टोबर महिन्यात साडेसहा कोटी
दसरा आणि दिवाळी काळात नागरिकांच्या वतीने आपल्या पसंतीच्या क्रमांकासाठी 4680 अर्ज दाखल झाले असून, याद्वारे 6 कोटी 57 लाख 34 हजार रुपयांची विक्रमी रक्कम शहराच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाला मिळाले आहेत.