मिलिंद कांबळे
पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या वतीने निगडी येथे सिटी कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटर पाच वर्षांनंतरही संपूर्णपणे कार्यान्वित झालेले नाही. या सेंटरच्या माध्यमातून संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरावर 24 तास ‘वॉच’ ठेवता येणार आहे. शहराची गरज वाढल्याने निगडीनंतर चिंचवड येथे पोलिसांसाठी स्वतंत्र सेंटर उभारले जात आहेत.
शहराच्या तब्बल 30 लाख लोकसंख्येवर 24 तास वॉच ठेवण्यासाठी, कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी स्मार्ट सिटीने हे सेंटर बांधले आहे. त्या शहरातील सुमारे 3 हजारांपेक्षा सीसीटीव्ही कॅमेर्यांची या केंद्राशी जोडणी केली आहे. या सेंटरच्या माध्यमातून शहरातील रस्ते, महत्त्वाचे चौक, विविध महत्त्वाच्या तसेच गर्दीच्या ठिकाणांवर दिवस-रात्र लक्ष ठेवण्यात येणार आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने कोठे काही अनुचित प्रकार घडल्यास, वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ कार्यवाही करणे शक्य होणार आहे. शहरातील कचरा उचलणार्या वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली असून, त्यांच्यावर या सेंटरद्वारे देखरेख ठेवली जात आहे.
शहरात तीन हजारांपेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. भूमिगत ऑप्टिकल फायबर केबल नेटवर्किंगचे कामही पूर्ण झाले आहे. सीसीटीव्ही कॅमेरा केबल नेटवर्किंगशी जोडण्यात आले आहे. शहरात तब्बल 600 किलोमीटर अंतराचे केबल नेटवर्किंग व सीसीटीव्ही कॅमेर्यांचे जाळे उभारण्यात आले आहे. ही यंत्रणा सेंटरशी जोडण्यात आली आहे. देशात प्रत्येक मेट्रोपोलिटन सिटीसाठी कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटर बंधनकारक आहे. त्यानुसार, स्मार्ट सिटीअंतर्गत तब्बल 441 कोटी 23 लाख खर्च करून हे सेंटर बनविण्यात आले आहे.
पहिल्या टप्प्यात अ क्षेत्रीय कार्यालय हद्दीवर 24 तास नियत्रंण व देखरेख ठेवण्यास सेंटरच्या माध्यमातून सुरुवात झाली आहे. त्याची सुरुवात ऑगस्ट 2022 ला झाली. उर्वरित सात क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सेंटरद्वारे 24 तास वॉच ठेवण्यासाठी यंत्रणा तयार केली जात आहे. अद्याप सेंटरचे काम 100 टक्के पूर्ण न झाल्याने संपूर्ण शहराला त्यांचा लाभ मिळत नसल्याचे चित्र आहे. त्या कामास वारंवार मुदतवाढ देण्याची नामुष्की प्रशासनावर ओढविली आहे.
स्मार्ट सिटी लिमिटेडने सल्लागारांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करून करून निगडी येथे कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटर तयार केले आहे. आता जागा तसेच, यंत्रणा अपुरी पडत असल्याने पोलिसांनी चिंचवड येथे स्वतंत्र कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटर उभारण्याची मागणी केली आहे. पोलिसांच्या मागणीनुसार वर्दळीचे चौक, सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. महापालिकेकडून सीसीटीव्ही सर्व्हलन्सचे दुसर्या टप्प्यातील काम सुरू आहे. ही नवी यंत्रणा निगडीतील सेंटरमध्ये सामावून घेण्याची क्षमता नाही. त्यामुळे चिंचवड येथे नव्याने सेंटर करण्याची नामुष्की स्मार्ट सिटी व महापालिकेवर ओढवली आहे.
त्यावर आणखी कोट्यवधींचा खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे सल्लागारांच्या सल्लावर झालेला कोट्यवधींचा खर्च पाण्यात गेल्याचे स्पष्ट होत आहे. भविष्याचा विचार करून कमांड अॅण्ड कंट्रोलचा आराखडा तयार केला नसल्याने महापालिकेवर अतिरिक्त खर्च पडला आहे.
निगडी येथील सेंटरमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पोलिस असे दोन विभाग होते. मात्र, तेथील जागा, यंत्रणा व क्षमता अपुरी पडत असल्याने पोलिसांसाठी चिंचवड येथील जुन्या ग क्षेत्रीय कार्यालयाच्या इमारतीमध्ये नव्याने कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटर बांधण्यात येत आहे. त्या सेंटरमधून पोलिसांना शहरावर 24 तास नजर ठेवता येणार आहे. तसेच, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर पाळत ठेवता येणार आहे. शहराची कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी, वाहतूक, रहदारी, दंगल, जमाव नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना सेंटरचा मोठा उपयोग होणार आहे. पर्यावरण, घनकचरा व्यवस्थापन, वाहनतळ, पाणीपुरवठा, पीएमपी बस वाहतूक, महापालिकेचे कामकाज आदी कामे महापालिकेकडून सेंटरमधून केली जाणार आहेत. व्हीएमडीवर दररोज हवामान, प्रदूषणाची पातळी, महापालिका व पोलिसांकडून दिले जाणारे संदेश नागरिकांना दिसणार आहेत. तसेच, महापालिकेच्या विविध विभागाची सर्व माहिती या सेंटरमधील डाटा सेंटरमध्ये संग्रहित केली जाणार आहे.
कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटरचे काम अजून पूर्ण झालेले नाही. कामाची मुदत नोव्हेंबर 2024 अखेरपर्यंत आहे. महापालिका व पोलिसांकडून शहरात नव्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जात आहेत. तसेच, विविध नव्या कामांची मागणी वाढत असल्याने चिंचवड येथे पोलिसांसाठी स्वतंत्र कंमाड अॅण्ड कंट्रोल सेंटर उभारण्यात येत आहे, असे स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव यांनी सांगितले.