

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा
शहरात आतापर्यंत डेंग्युचे १७८ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर, चिकुनगुनियाचे ३४ आणि झिकाच्या आजाराने ग्रस्त सहा रुग्ण आहेत. झिका रुग्णांपैकी चार रुग्ण गर्भवती महिला असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना घरी सोडले आहे.
गर्भवतींना झिका किंवा डेंग्यू आजारातील ताप, सांधेदुखी, डोळ्यांमागे दुखणे आदी लक्षणे आढळल्यास त्यांनी डॉक्टरांचा सल्ला व वैद्यकीय तपासणी त्वरित करून घेण्याचे आवाहन वैद्यकीय विभागाने केले आहे. डेंग्यू, चिकुनगुनिया आणि झिका आजारांच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय विभागामार्फत एकूण ६० हजार ७१९ कुटुंबांची तपासणी करण्यात आली.
त्यात १६४ गर्भवतींचे रक्तजल नमुने घेण्यात आले. त्यापैकी चौघींना झिका आजाराची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या महापालिकेतर्फे शहरभर डेंग्युमुक्त पीसीएमसी (बीट डेंग्यू) मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेत सोमवार ते शनिवार वैद्यकीय आणि इतर विभागांतर्फे डास नियंत्रणाबाबत विविध प्रकारची उपाययोजना केली जात आहे.
दर रविवारी नागरिकांनी त्यांच्या घरांची आणि परिसराची सकाळी ९ ते १० या वेळेत तासभर साफसफाई करण्याची मोहीम राबवायची आहे. डेंग्यूबाबत जनजागृती कीटकजन्य आजारांबाबत बॅनर लाऊन जनजागृती करण्यात येत आहे. महापालिका रुग्णालयांमधील वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी विविध ठिकाणी डेंग्यू आजाराविषयी घ्यावयाच्या काळजीबाबत माहिती देत आहेत.
विविध चौकांमध्ये, वर्दळीच्या ठिकाणी महापालिकेने एलईडी स्क्रिन लावले आहे. त्यावर डेंग्यू आजाराबाबत जनजागृती करणारे व्हिडीओ/ ऑडिओ आहेत. हस्तपत्रिका वाटप करण्यात येत आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवात मंडळांच्या ठिकाणी जाऊन वैद्यकीय विभागातील कर्मचाऱ्यांकडून जनजागृतीपर माहितीपत्रकांचे वाटप केले जाणार आहे. त्याशिवाय, व्याख्यानांव्दारेही या आजारांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून नागरिकांनी काळजी घ्यावी. कोणत्याही प्रकारचा ताप, डेंग्यू किंवा कीटकजन्य आजारांची लक्षणे आढळल्यास संबंधितांनी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्यावा. -
डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी