Pimpri News: ‘साहेब.., इथे खूप गर्दी जमलीय, विरोधी उमेदवारांचे कार्यकर्ते पैसे वाटताहेत... लवकर या’. बुधवारी (दि. 20) दिवसभरात नियंत्रण कक्षाला अशा प्रकारचे 37 कॉल्स प्राप्त झाले. ज्यामुळे पोलिसांची मोठी धावपळ झाल्याचे चित्र शहर परिसरात पहावयास मिळाले.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असलेल्या भोसरी, पिंपरी, चिंचवड आणि मावळ विधानसभा मतदारसंघात मतदानप्रक्रिया पार पडली. काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहर परिसरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, बुधवारी दिवसभर पैसे वाटपाचे 37 फेक कॉल पोलिस नियंत्रण कक्षाला प्राप्त झाले.
पोलीस नियंत्रण कक्षाला कॉल प्राप्त झाल्यानंतर गस्तीवरील पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र, काही किरकोळ वगळता पोलिसांच्या हाती मोठी रक्कम लागली नाही. यातील बहुतांश कॉल्स हे फेक असल्याचे समोर आले. पहिल्या कॉल्सची पूर्तता होईपर्यंत लगेचच दुसरा कॉल पडत असल्याने गस्तीवरील पोलिसांची मोठी दमछाक होत असल्याचे दिसून आले.
जाणीवपूर्वक खोडसाळपणा
काहीजणांनी पैसे वाटप होत असल्याच्या संशयातून पोलिस नियंत्रण कक्षाला कॉल केले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन खातरजमा केल्यानंतर ही बाब समोर आली. तर, काही कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक खोडसाळपणेदेखील कॉल्स दिल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.