

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 साठी केवळ पाकिस्तान संघच नाही तर तिथून अनेक लोक भारतात आले आहेत. यामध्ये काही पंच, काही समालोचकांचा समावेश आहे. तसेच या सामन्याचे वृत्तांकन करण्यासाठी झैनब अब्बास (Zainab Abbas) ही महिला अँकर देखील आली आहे. मात्र ही अँकर आता एका मोठ्या वादात सापडली आहे. ज्यामुळे तिची भारतातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
भारतात वनडे वर्ल्डकप स्पर्धा सुरु असून दहा संघ सहभागी झाले आहेत. यात सर्वच देशांचे पत्रकार सामन्यांचं कव्हरेज करण्यासाठी भारतात आले आहेत. यात आयसीसी वर्ल्डकप होस्ट करण्यासाठी पाकिस्तानची महिला पत्रकार जैनब अब्बास ही भारतात आली होती. पण आता तिची भारतातून हकालपट्टी करण्यात आली आहे. भारताविरोधात वक्तव्ये केल्यामुळे ही अँकर वादात सापडली आहे.
साम टीव्ही या पाकिस्तानी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये आयसीसीसाठी काम करणाऱ्या झैनाब अब्बासला एका वादग्रस्त प्रकरणामुळे भारतातून बाहेर काढण्यात आले आहे. आरोपांमध्ये सायबर गुन्हे आणि भारत आणि धर्माविरोधात जुने ट्विट यांचा समावेश आहे.
पाकिस्तानी पत्रकार जैनब अब्बास सध्या दुबईत असल्याची चर्चा आहे. हिंदू देवी देवतांचा अपमान केल्याप्रकरणी तिच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. भारतीय वकील विनीत जिंदल यांच्या तक्रारीनंतर हे पाऊल उचललं गेलं आहे. काही वर्षांपूर्वी केलेल्या सोशल मीडिया पोस्ट प्रकरणानंतर तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. या पोस्टमध्ये तिने हिंदू देवी आणि देवतांबाबत आक्षेपार्ह लिहले होते अशी प्राथमिक माहिती आहे. तिच्यावर केलेली ही कारवाई पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का आहे.