शाळा होणार तंबाखूमुक्त | पुढारी | पुढारी

शाळा होणार तंबाखूमुक्त | पुढारी

कोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा पहिल्या टप्प्यात तंबाखूमुक्त करण्याचा संकल्प आहे. दुसर्‍या टप्प्यात माध्यमिक तसेच अन्य खासगी शाळा तंबाखूमुक्त करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी सांगितले. जिल्हा परिषदेच्या 1980 शाळांपैकी आतापर्यंत 966 शाळा तंबाखूमुक्त झाल्या असून उर्वरित शाळा येत्या 25 नोव्हेंबरपर्यंत तंबाखूमुक्त करण्याचा निर्धार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्हास्तरीय तंबाखू संनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी  देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. तंबाखूमुक्त शाळांसाठी शासनाने निश्चित केलेल्या 11 निकषांची  सर्व शाळांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करत शाळा तंबाखूमुक्त बनवाव्यात, असे आदेश त्यांनी दिले.

शाळांच्या परिसरात तंबाखूच्या वापरास प्रतिबंध, तंबाखू नियंत्रण समितीची स्थापना, धूम—पान आणि ‘तंबाखूचा वापर करणे हा एक गुन्हा आहे,’ असे फलक लावणे, शाळांमध्ये तंबाखूचे दुष्परिणाम आणि तंबाखू नियंत्रण कायद्याची पोस्टर्स लावणे, तंबाखूविरोधी संदेश शालेय साहित्यावर चिटकवणे, कोटपा कायद्याची प्रत शाळेत ठेवणे, शासन नियुक्त नोडल अधिकारी व आरोग्य अधिकारी यांच्या सल्ल्याने कामकाज करणे, शाळेच्या नियमित आरोग्य उपक्रमामध्ये तंबाखू नियंत्रणचा समावेश करणे, शाळेपासून 100 यार्ड क्षेत्रात तंबाखू उत्पादनाच्या विक्रीवर पूर्ण बंदी असल्याचे फलक लावणे, तंबाखू नियंत्रण उपक्रमात काम करणार्‍यांचा गौरव करणे आणि आमची शाळा तंबाखूमुक्त शाळा असा फलक लावणे, असे 11 निकष आहेत. त्याची 

अंमलबजावणी करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

तंबाखू नियंत्रण कायद्यांतर्गत जिल्हा परिषदेच्या 1980 शाळांपैकी आतापर्यंत 966 शाळा तंबाखूमुक्त झाल्या आहेत. यामध्ये आजरा तालुक्यातील 69, भुदरगड तालुक्यातील 83, चंदगड तालुक्यातील 106, गडहिंग्लज तालुक्यातील 119, गगनबावडा 11, हातकणंगले 145, कागल 69, करवीर 76, पन्हाळा 56, राधानगरी 30, शाहूवाडी 138 आणि शिरोळ 63 तंबाखूमुक्त शाळांचा

 समावेश आहे. उर्वरित सर्व शाळांनी तंबाखूमुक्त शाळेसंदर्भातील असलेल्या 11 निकषांची पूर्तता करण्याचे आदेश देसाई यांनी दिले. याकामी गटशिक्षण अधिकार्‍यांनी पुढाकार घेऊन सर्वांच्या सहकार्याने जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा येत्या 25 नोव्हेंबरपर्यंत तंबाखूमुक्त कराव्यात अशा सूचनाही दिल्या.

 या बैठकीस प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विलास देशमुख, अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर, डॉ. माने, महापालिका प्रशासन अधिकारी एस.के.यादव, राष्ट्रीय तंबाखू मुक्त कार्यक्रमाच्या समुपदेशक चारुशिला कनसे, सामाजिक कार्यकर्त्या क्रांती शिंदे, सलाम मुंबई फॉउडेंशनचे रवी कांबळे यांच्यासह सर्व गट शिक्षण अधिकारी तसेच सदस्य आणि सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

शाळांच्या 100 यार्ड परिघात  तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी 

शाळा, महाविद्यालये तसेच उच्च शिक्षण संस्थांमध्ये 100 यार्ड परिघात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास कायद्यान्वये बंदी असल्याचे स्पष्ट करून जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, शाळांच्या परिसरात तंबाखू नियंत्रण कायदा 2003 चे उल्लंघन केल्यास संबंधिताविरुद्ध कडक कारवाई करा, असे निर्देशही त्यांनी दिले. शिक्षण संस्थाप्रमुख तसेच मुख्याध्यापकांनी तंबाखू नियंत्रण कायद्याची कडक अंमलबजावणी करून शैक्षणिक संस्था, शाळांचा परिसर तंबाखूमुक्त ठेवावा. शाळा तसेच महाविद्यालय परिसरात तंबाखू नियंत्रणासाठी विशेष जनजागृतीपर फलक लावावेत. या कामी मुख्याध्यापक, प्राचार्य तसेच संस्थाचालकांनी सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Back to top button