MPSC entrance exam : एमपीएससी प्रवेश परीक्षा घेणाऱ्या एजन्सीचा कार्यादेश रद्द! महाज्योतीचा मोठा निर्णय

MPSC entrance exam : एमपीएससी प्रवेश परीक्षा घेणाऱ्या एजन्सीचा कार्यादेश रद्द! महाज्योतीचा मोठा निर्णय
Published on: 
Updated on: 

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : परीक्षा घेणाऱ्या एजन्सीने केलेल्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. तसेच त्यांचे आर्थिक नुकसान आणि वेळेचा अपव्यय झाल्याची बाब लक्षात घेता महाज्योतीने परीक्षा घेणाऱ्या एजन्सीचा कार्यादेश रद्द केला आहे. त्यामुळे या प्रवेश परीक्षा पुन्हा नव्याने घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाज्योतीने यूपीएससी तसेच एमपीएससी प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्याकरिता एका परीक्षा एजन्सीद्वारे अनुक्रमे 16 जुलै 2023 व 30 जुलै 2023 रोजी महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रांवरती प्रवेश परीक्षा आयोजित केली होती. (MPSC entrance exam)

16 जुलै 2023 रोजी यूपीएससी प्रशिक्षणासाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेमध्ये काही परीक्षार्थी उमेदवारांनी गैरप्रकार केल्याच्या तक्रारी महाज्योती कार्यालयास प्राप्त झाल्या होत्या. याबाबत व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केले होते. चौकशी अधिकारी यांनी परीक्षा घेणाऱ्या एजन्सीकडून गैरप्रकार केलेल्या विद्यार्थ्यांचा अहवाल मागविला होता.

विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र  उपलब्ध झाल्यानंतर दिनांक 30 जुलै 2023 रोजी एमपीएससी प्रशिक्षणासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात आली. या परीक्षे दरम्यान विशिष्ट प्रशिक्षण संस्थेतील सराव प्रश्नपत्रिका मधील प्रश्न जसेच्या तसे घेण्यात आल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी महाज्योती कार्यालयाकडे केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत चौकशी करण्याच्या सूचना व्यवस्थापकीय संचालक यांनी मुख्य लेखा वित्त अधिकारी यांना दिल्या होत्या. याबाबत चौकशी अधिकारी यांनी परीक्षा घेणाऱ्या एजन्सीला याबाबत खुलासा करण्याकरिता सांगितले होते. परीक्षा एजन्सीकडून महाज्योतीच्या चौकशी अधिकारी यांना खुलासा सादर करण्यात आला. मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी या प्रकरणांची सखोल चौकशी करून त्या संदर्भातील अहवाल व्यवस्थापकीय संचालक यांना सादर केला.

या चौकशी अहवालामध्ये परीक्षा घेणाऱ्या एजन्सीने निष्काळजीपणा केल्याचे सिद्ध झाले आहे. परीक्षा घेणाऱ्या एजन्सीने केलेल्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. तसेच त्यांचे आर्थिक नुकसान आणि वेळेचा अपव्यय झाल्याची बाब तसेच परीक्षा एजन्सीने केलेल्या निष्काळजीपणामुळे महाज्योतीची प्रतिमा मलीन झाली आहे. त्यामुळे सामंजस्य करारातील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक यांनी परीक्षा एजन्सीचा कार्यादेश रद्द करण्याचे आदेश आज दिनांक 3 ऑगस्ट रोजी निर्गमित केले आहे.

पुन्हा होणार प्रवेश परीक्षा

यूपीएससी व एमपीएससी प्रशिक्षणासाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असून परीक्षा घेण्यासाठी अन्य यंत्रणेची निवड करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. परीक्षेच्या वेळापत्रकाबाबतची माहिती विद्यार्थ्यांना महाज्योतीच्या संकेतस्थळावरून प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळविण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news