उजळाईवाडी : पुढारी वृत्तसेवा
कोल्हापूर हे देशातील महत्त्वाचे शहर आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून विमानतळ विस्तारीकरणाचे काम चांगल्या प्रकारे सुरू आहे. काही दिवसांत कोल्हापूर विमानतळ चांगल्या दर्जाचे बनवले जाईल, अशी ग्वाही पश्चिम विभागाचे रिजनल एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर जे. टी. राधाकृष्णन यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना दिली .
राधाकृष्णन व पश्चिम विभागाचे महाव्यवस्थापक सतीशकुमार गुप्ता विमानतळाच्या आढावा बैठकीसाठी मंगळवारी कोल्हापूर दौर्यावर आले आहेत. यावेळी ते बोलत बोलत होते. विमानतळ संचालक कमलकुमार कटारिया व सहकार्यांनी त्यांचे स्वागत केले.
नाईट लँडिंगचे काम लवकर
कोल्हापूर विमानतळाच्या टर्मिनस बिल्डिंग, धावपट्टी असे विस्तारीकरणाचे काम सुरू आहे तसेच नाईट लँडिंगचे कामही योग्यरीत्या सुरू आहे. नाईट लँडिंगची सुविधा झाल्यानंतर कोल्हापूर विमानतळाची कनेक्टिव्हिटी देशातील मोठ्या शहरांशी जोडू शकते. त्यासाठी कोल्हापूरमध्येही प्रवाशांची संख्या अतिशय चांगल्या पद्धतीने असल्याने येत्या काही दिवसांत कोल्हापूरच्या विकासाला गती प्राप्त होईल.
टीमवर्क म्हणून काम करा
राधाकृष्णन व गुप्ता यांनी विमानतळाच्या प्रत्येक विभागाची पाहणी केली. कोल्हापूरसारख्या चांगल्या शहरात तुम्ही काम करत आहात. कोणतेही हेवेदावे न ठेवता सर्वानी विमानतळाच्या विकासासाठी एकदिलाने काम करा, असा सल्ला त्यांनी अधिकारी व कर्मचार्यांना दिला.
विमानतळावर वृक्षारोपण
भारताला स्वातंत्र्य मिळून 15 ऑगस्टला 74 वर्षे पूर्ण होऊन 75 व्या वर्षात पदार्पण होत आहे. यानिमित्ताने देशभरात विमानतळावर वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे त्याचाच एक भाग म्हणून जे. टी. राधाकृष्णन व सतीशकुमार गुप्ता, कमलकुमार कटारिया यांच्या हस्ते विमानतळावर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी केंद्र शासनाकडून पाण्याचा योग्य वापर करून बाग फुलवल्याबद्दल मिळालेल्या पुरस्कारासाठी कटारिया व त्यांच्या सर्व टीमचे त्यांनी कौतुक केले.