डंपरने महिलेला चिरडले; नातेवाईक आक्रमक

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा
भरधाव वेगातील डंपरने चिरडल्याने दुचाकीवरून जात असलेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये मृत महिलेचा पुतण्याही गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी ( ०९) सकाळी दहाच्या सुमारास विनोदेनगर, वाकड येथे घडली. डंपर चालकाला अटक केल्याशिवाय मृतदेह उचलून देणार नाही, असा पवित्रा महिलेच्या नातेवाईकांनी घेतल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
लक्ष्मी विठ्ठल शिंदे (५०, मूळ रा. बार्शी, सोलापूर, सध्या रा. बाणेर) असे मृत्यू झालेल्या महिलेचा नाव आहे. तर, पुतण्या आकाश शहाजी शिंदे (वय २५) हा जखमी झाला आहे. पोलिसांनी डंपर चालक अविनाश दिनकर यादव (सध्या रा. विनोदेवस्ती, वाकड मूळ रा. पाथर्डी, अहमदनगर) याच्यावर गुन्हा दाखल करीत त्यास तत्काळ अटक केली आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत लक्ष्मी शिंदे गुरुवारी (दि. ८) कासारसाई येथे मुलाच्या घरी गेल्या. तेथून सकाळी पुतण्या आकाश याच्या दुचाकीवर मागे बसून बाणेरच्या दिशेने येत होत्या. दरम्यान, विनोदेनगर येथे आरोपी अविनाश चालवत असलेल्या डंपरने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. त्यामुळे दोघेही रस्त्यावर कोसळले. डंपरचे मागचे चाक डोक्यावरून गेल्याने लक्ष्मी यांचा जागीच मृत्यू झाला. तर, आकाश याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच लक्ष्मी यांचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. तसेच, रस्त्याने जाणाऱ्या बघ्यांचीही मोठी गर्दी झाली होती. लक्ष्मी यांच्या नातेवाईकांनी रस्त्यावर पडलेला मृतदेह हलवण्यास विरोध केला. आधी डंपर चालकाला अटक करा, मगच मृतदेह उचला, अशी मागणी करीत नातेवाईक आक्रमक झाल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. शेवटी हिंजवडी पोलिसांनी नातेवाईकांची कशीबशी समजूत घालून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला. पुढील तपास हिंजवडी पोलिस करीत आहेत.
प्रशासनाच्या उदासीनतेमुळे महिलेचा बळी
हिंजवडीकडे जाणारे रस्ते प्रशस्त रस्त्यांमुळे वाहने भरधाव वेगात धावतात. परिणामी अपघातांची संख्या वाढली आहे. स्थानिक नागरिक दररोज जीव मुठीत घेऊन बाहेर पडतात. विनोदेनगर चौकात गतिरोधक उभारण्यात यावे, यासाठी महापालिका, वाहतूक विभाग, लोकप्रतिनिधी यांना यापूर्वी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, याकडे कोणीही लक्ष दिले नाही. त्यामुळे लक्ष्मी शिंदे यांचा प्रशासनाच्या उदासीनतेने बळी घेतला, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
– विक्रम विनोदे, स्थानिक नागरिक