

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : गहू, तांदूळ आणि साखरेच्या निर्यातीवरील बंदी हटविण्याचा सध्या कोणताही प्रस्ताव नाही. तसेच गहू आणि साखरेची आयातही होणार नसल्याचे केंद्र सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. वाणिज्य आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री पीयुष गोयल यांनी आज दिल्लीत झालेल्या कार्यक्रमादरम्यान ही माहिती दिली.
देशातील गव्हाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने मे २०२२ मध्ये गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. यानंतर जुलै २०२३ पासून बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवरही बंदी घालण्यात आली. पाठोपाठ ऑक्टोबर २०२३ मध्ये साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा आदेशही केंद्र सरकारने जारी केला होता. वाणिज्य मंत्रालयाच्या अहवालानुसार, गहू, तांदूळ आणि साखरेच्या निर्यातीवरील निर्बंधांमुळे भारताच्या कृषी निर्यातीत ४ अब्ज डॉलर्सपर्यंत घट होऊ शकते.
देशांतर्गत बाजारपेठेतील जीवनावश्यक वस्तुंची उपलब्धता आणि किमतीवर नियंत्रण यासाठी सरकारने घेतलेल्या निर्यातबंदीच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर मंत्री गोयल यांनी आज सांगितले, की गहू, तांदूळ आणि साखरेच्या निर्यातीवरील बंदी उठवण्याचा सरकारसमोर सध्या कोणताही प्रस्ताव नाही. सोबतच, परदेशातून गहू आणि साखर आयात करण्याचा देखील भारताचा विचार नाही आणि अशा आयातीची गरजही नाही.
मित्रदेशांच्या अन्नसुरक्षेची गरज भागविण्यासाठी भारतातर्फे अन्नधान्याची निर्यात केली जात असल्याची पुस्तीही मंत्री गोयल यांनी जोडली. ते म्हणाले, की भारत इंडोनेशिया, सेनेगल आणि गॅम्बिया सारख्या मित्र देशांमध्ये भारत तांदूळ निर्यात करत आहे.