अंतराळात कधी होणार पहिल्या मुलाचा जन्म ?

वॉशिंग्टन : पृथ्वीवरील लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. यामुळे लोकांनी संपूर्ण पृथ्वी भरून जाईल, असा दिवस फार दूर नाही, असेच आता वाटू लागले आहेे; पण ज्यावेळी लोकसंख्येने पृथ्वी भरून जाईल, म्हणजेच लोकांना राहण्यासाठी जागाच शिल्‍लक राहणार नाही, त्यावेळी माणूस कोठे राहील? असा प्रश्‍न निर्माण होतो. 

येणार्‍या काही दशकांत पृथ्वीवर राहण्यासाठी जागाच शिल्लक राहणार नाही. अशा स्थितीत मानवापुढे एकच पर्याय राहील आणि तो म्हणजे अवकाशात राहणे. यासंदर्भात करण्यात आलेल्या एका संशोधनातील माहितीनुसार, पृथ्वीवर दर मिनिटाला सरासरी सुमारे 250 मुलांचा जन्म होतो. यामुळे असा दिवस फार दूर नाही की, पृथ्वीवर राहण्यासाठी जागाच शिल्‍लक राहणार नाही. यामुळे अवकाशात राहण्याशिवाय मानवापुढे दुसरा पर्यायच राहणार नाही. अशा स्थितीत अशी वेळ कधी येईल की, त्यावेळी मानवाचे मूल अंतराळात जन्म घेईल.

'युनिव्हर्सिटी ऑफ अ‍ॅरिझोना'चे संशोधक क्रिस इंपी यांनी सांगितले की, सुमारे तीन दशकांनंतर म्हणजे येत्या 30 वर्षांनंतर मानव हा अंतराळात राहण्यास सुरुवात करेल. एवढेच नव्हे, तर 2051 किंवा आसपास अंतराळात मानवाच्या पहिल्या मुलाचा जन्म होईल. नवजात मुले फारच नाजूक असतात, असे सर्वांनाच माहीत आहे. यामुळे अशा मुलांचे अंतराळात पालन करणे फारच अवघड काम असणार आहे. यासाठी अंतराळात तयार करण्यात येणार्‍या बेस स्टेशनचे इन्फ्रास्ट्रक्‍चर अत्यंत आधुनिक असावे लागणार आहे. जेणेकरून महिलेची सुरक्षित डिलिव्हरी होऊन नवजात मुलांचे पालन केले जाऊ शकेल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news