मग महाराष्ट्राबाबत पंतप्रधानांचा भेदभाव का? 

मुंबई; पुढारी ऑनलाईन : ताऊक्ते चक्रीवादळाने गुजरात महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोरदार तडाखा दिला. ताऊक्ते चक्रीवादळ गुजरात आणि दीव किनारपट्टीला जाऊन धडकल्याने तेथील प्रचंड नुकसान झाले आहे. याचपार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना, ताऊक्तेने महाराष्ट्राचेही नुसकान केले आहे. मग महाराष्ट्राबाबत पंतप्रधानांचा भेदभाव का? असा सवाल केला आहे. 

अधिक वाचा : मुंबईत 2414 झाडे कोसळली!

यावेळी मलिक यांनी देशातल्या काही ठिकाणी ताऊक्ते वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातप्रमाणेच महाराष्ट्रातल्या नुकसानीचीही पाहणी का केली नाही? असा सवाल त्यांनी ट्विट करत केला आहे. तसेच मलिक यांनी आपल्या ट्विटमध्ये, आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजी दमण, दीव आणि गुजरात परिसरात ताऊक्ते वादळाने केलेल्या नुकसानीही पाहणी करत आहेत. तसेच महाराष्ट्रातल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी ते का करत नाहीत? हा सरळ सरळ भेदभाव नाही का? असे म्हटले आहे. 

दरम्यान अरबी समुद्रातील ताउक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमिवर प्रशासन सज्ज असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १६ मे रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत दिली. त्यावेळी त्यांनी विशेषतः कोरोना रुग्णालयांचा विद्युत पुरवठा खंडित होऊ नये तसेच ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहील यादृष्टीने अगोदरच तयारी करून ठेवल्याचेही सांगितले होते.  

अधिक वाचा : तौक्‍तेने रायगडचे 600 कोटींचे नुकसान

२ हजार ४१४ झाडे कोसळली

ताउक्ते चक्रीवादळात ताशी १०० ते ११४ किमी वेगाने वाहणार्‍या वार्‍यामुळे मुंबई शहरात तब्बल २ हजार ४१४ झाडे कोसळली. तर वरळी बीडीडी चाळ येते वडाचे झाड पडून जखमी झालेल्या संगीता खरात या ४५ वर्षाच्या महिलेचा केईएम हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.

रायगडात ६०० कोटींचे नुकसान 

निसर्ग चक्रीवादळानंतर सावरण्यासाठी प्रयत्न सुरू केलेल्या रायगडकरांना वर्षभराच्या आताच तौक्ते चक्रीवादळाचा सामना करावा लागला. तौक्ते चक्रीवादळाने रायगड जिल्ह्याला चांगलाच दणका दिला आहे. रायगडातील सर्वच तालुके या चक्रीवादळामध्ये प्रभावित झाले असून यात ६०० कोटींचे नुकसान झाली आहे. या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका अलिबाग, श्रीवर्धन, म्हसळा आणि पोलादपूर या तालुक्यांना बसला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news