पश्चिम डोंबिवलीत सुसाट गँगने काढले डोके वर!

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा

हाफमर्डरच्या गुन्ह्यात तुरूंगातून पॅरोलवर सूटलेल्या सुसाट गँगच्या म्होरक्याने पुन्हा एकाचा मुडदा पाडण्याचा प्रयत्न केला. तिघा गुंडांनी केलेल्या हल्ल्यातून दुकानदार बालंबाल बचावला. मात्र वारंवार गुंगारा देणाऱ्या या गँगच्या म्होरक्याला विष्णूनगर पोलिसांनी मोठ्या कौशल्याने बेड्या ठोकून गजाआड केले. अनिकेत उर्फ पंड्या दत्तात्रय म्हात्रे (वय २०) असे हल्लेखोराचे नाव असून तो डोंबिवली पश्चिमेतील सुभाष रोडला असलेल्या कुंभारखाणपाडा परिसरात राहतो.

अधिक वाचा : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामध्ये नोकरीची संधी

६ मे रोजीच्या रात्री साडेबाराच्या सुमारास महात्मा फुले रोडला कोलते जनरल स्टोअर्ससमोर सुसाट गँगचा म्होरक्या अनिकेत उर्फ पंड्या आणि त्याचे साथीदार साहिल श्रीनिवास ठाकुर उर्फ वालट्या (वय २२) आणि सोमेश नवनाथ म्हात्रे (वय २५) यांनी दहशत माजविली होती. या तिघांनी मिळून दुकान मालक कोलते यांचा खून करण्याचा प्रयत्न केला होता. हे तिघेजण कोलते यांच्या घराचा दरवाजा ठोकत होते.

दरवाजा ठोठावू नका, असे कोलते यांनी सांगितल्याने त्या गोष्टीचा तिघांना राग आला. त्यांनी दुकानदार कोलते यांना शिवीगाळ करत त्यांच्या दोन्ही डोळ्यांवर ठोसे लगावले. यातील अनिकेत म्हात्रे उर्फ पंड्या याने कोलते यांच्या गळ्यावर कमरेला खोचलेल्या चाकूच्या साह्याने हल्ला केला. त्यात कोलते यांना जबर दुखापत झाली. तर साहिल ठाकुर उर्फ वालट्या याने कोलते यांच्या पाठ व डोक्यावर मारून बांबूच्या उपट्या घालून दुखापत केली. तर सोमेश म्हात्रे यानेही कोलते यांना ठोसा-बुक्क्यांनी मारहाण केली. या हल्ल्यातून दुकान मालक कोलते हे बालंबाल बचावले. 

या प्रकरणी रुग्णालयात उपचार घेत असताना जखमी कोलते यांनी दिलेल्या जबानीवरून फरार तिघा हल्लेखोरांच्या विरुद्ध विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. आपल्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती कळताच हल्लेखोर पंड्या याने साथीदारांसह डोंबिवलीतून पळ काढला आहे. तेव्हापासून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि गणेश वडणे आणि त्यांचे पथक हल्लेखोरांच्या मागावर होते.

अधिक वाचा : मग महाराष्ट्राबाबत पंतप्रधानांचा भेदभाव का? 

फरार गुंड अनिकेत उर्फ पंड्या म्हात्रे हा मोठागाव खाडीजवळ येणार असल्याची खबर लागताच डीसीपी विवेक पानसरे, डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस आयुक्त जय मोरे, वपोनि संजय साबळे यांच्या मार्गदर्शनानुसार आणि सपोनि गणेश वडणे यांच्या नेतृत्वाखाली पोना पाटणकर, पोना कुरणे, पोना सागंळे, पोना लोखंडे, कांगुणे, पोकॉ बडगुजर, पोकॉ महाजन या पथकाने सापळा रचला. या सापळ्यात गुंड अनिकेत उर्फ पंड्या हा अलगद अडकला. त्याच्याकडून कमरेला खोचलेला चाकू जप्त करण्यात आल्याचे सपोनि गणेश वडणे यांनी सांगितले. 

चौकशीदरम्यान पंड्याने यापूर्वीही अन्य एकाला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या गुन्ह्यात तो तुरूंगात होता. मात्र पॅरोलवर सुटल्यानंतरही त्याने दुकान मालकाला ठार मारण्याचा प्रयत्न केला. या गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने अनिकेत उर्फ पंड्या याला नव्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. दरम्यान कल्याण न्यायालयाने अधिक चौकशीकरिता त्याला ३ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे फर्मान सोडले आहे.

अधिक वाचा : ठाकरे सरकारकडून पदोन्नती आरक्षण रद्दच्या निर्णयाला स्थगिती!

सुसाट ग्रुपचे गुंड टोळीत रूपांतर

पश्चिम डोंबिवलीच्या कुंभारखाणपाडा परिसरात सुसाट ग्रुप नावाने तरूणांची टोळी तयार झाली. वास्तविक हा ग्रुप सामाजिक क्षेत्रात कार्य करेल असे वाटत असतानाच ७ नोव्हेंबर २०१९ रोजी मध्यरात्री या ग्रुपचे गुंड टोळीत रूपांतर झाले. यानंतर मिलिंद घोलप या तरुणाच्या जबानीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या तक्रारीनुसार पोलिसांनी अनिकेत म्हात्रे उर्फ पंड्या, यशवंत मराठे आणि साहिल ठाकूर या तिघांना बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर कल्याण न्यायालयाच्या आदेशानंतर अनिकेत म्हात्रे उर्फ पंड्या याची रवानगी आधारवाडी तुरूंगात करण्यात आली होती. तर गौरव म्हात्रे, करण भोईर आणि सोमेश रिक्षावाला या त्रिकुटाच्या शोधार्थ पोलिस त्यांना जंग जंग करत होते. 

चौकशीदरम्यान अनिकेत उर्फ पंड्या हा सुसाट ग्रुपचा म्होरक्या असल्याचे समोर आले. याच अनिकेत उर्फ पंड्या याने अनिल चंदनशिवे आणि मिलिंद घोलप याला सोबत आणलेल्या चाकूने भोसकून घायाळ केले होते. तर अनिल आणि मिलिंद यांना वाचवण्यासाठी मधे पडलेल्या विकास नवले याच्यावरही वार केले होते. तेव्हापासून सुसाट गँगचा म्होरक्या अनिकेत उर्फ पंड्या तुरूंगात होता. मात्र बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा डोके वर काढल्याचे नव्या उपद्व्यापावरून दिसून येते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news