अमेरिका इराणशी थेट युद्ध करणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणतात…

इराणमधील द्वितीय सर्वात शक्तिशाली मेजर जनरल कासिम सुलेमानी यांना अमेरिकेने इराकमध्ये शुक्रवारी हवाई हल्ल्यात ठार मारले. त्यामुळे जगभरात खळबळ उडाली. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जगाला तिसऱ्या युद्धाकडे ढकलत असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. धगधगत असलेल्या पश्चिम आशियातही तणाव सर्वत्र शिगेला पोहोचला आहे. 

या हत्येनंतर इराण आणि सुपर पॉवर अमेरिका यांच्यातील संघर्ष तिसर्‍या महायुद्धाच्या दिशेने जाणारा आहे. दरम्यान, आखाती देशांमधील वाढता तणाव लक्षात घेता अमेरिकेने तीन हजार अतिरिक्त सैन्य पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, त्यांचा देश इराणशी युद्ध सुरू करू इच्छित नाही, परंतु जर इस्लामिक देशाने कोणतीही प्रतिक्रियात्मक कारवाई केली, तर अमेरिका त्यास सामोरे जाण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.

अधिक वाचा : अमेरिकेचा इराकमध्ये पुन्हा एअर स्ट्राईक; ६ ठार

फ्लोरिडामध्ये सुट्टीवर असलेल्या ट्रम्प यांनी ड्रोन हल्ल्यानंतर प्रथमच माध्यमांना सांगितले की, "इराणशी वाद वाढवण्यासाठी कासिम सुलेमानी मारले गेले नाहीत. काल रात्री आम्ही युद्ध संपवण्याची कारवाई केली. आम्ही युद्ध सुरू करण्यासाठी कारवाई केली नाही. ' ट्रम्प म्हणाले की आम्हाला इराणमध्ये सत्ता परिवर्तन नको आहे. परंतु, इराणी सरकार शेजार्‍यांना अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे ते बंद करावे लागेल.

ट्रम्प म्हणाले की सुलेमानी अमेरिकन मुत्सद्दी व लष्करी जवानांवर हल्ला करण्याचा कट रचत होते आणि म्हणूनच त्यांना लक्ष्य केले गेले. ते म्हणाले की जर इराणने प्रत्युत्तर दिले तर आम्ही त्यास सामोरे जाण्यासाठी उद्दिष्टे ओळखली आहेत आणि आवश्यक पावले उचलण्यास मी पूर्णपणे तयार आहे. ट्रम्प यांनीच सुलेमानी यांच्यावर हल्ल्याचा आदेश दिला होता. तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता अमेरिकन प्रशासन पश्चिम आशियामध्ये आणखी तीन हजार सैन्य पाठवत आहे. संरक्षण अधिकाऱ्यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.

अधिक वाचा : #America इराणच्या दुसऱ्या सर्वोच्च शक्तीशाली मेजर जनरलना अमेरिकेने का मारले?

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे सैनिक उत्तर कॅरोलिना येथील फोर्ट ब्रॅगच्या ८२व्या एअरबोर्न डिव्हिजनमधील आहेत. इराण-समर्थित मिलिशिया आणि त्यांच्या समर्थकांनी बगदाद येथील अमेरिकन दूतावासावर हल्ला केल्यावर या आठवड्याच्या सुरुवातीला कुवेत येथे तैनात करण्यात आलेल्या ८२ व्या एअरबोर्न विभागाच्या ७०० सैनिकांव्यतिरिक्त हे सैन्य असणार आहे. या आठवड्यात सैन्य तैनात करण्यापूर्वी ट्रम्प प्रशासनाने मेपासून पश्चिम आशियामध्ये १४ हजार अतिरिक्त सैन्य पाठवले आहेत. एवढेच नव्हे तर अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांनी चीन, सौदी अरेबियासह अनेक देशांच्या नेत्यांशी चर्चा केली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांनीही पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांशी चर्चा केली आहे. 

ट्रम्प यांचे वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा इराणने म्हटले आहे की या हत्येचा बदला घेतला जाईल. सुलेमानी यांच्या निधनानंतर इराणमध्ये तीन दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला असून त्यांना राष्ट्रीय नायकाचा दर्जा देण्यात आला आहे. संपूर्ण इराणमध्ये अनेक ठिकाणी निदर्शने झाली आहेत. आंदोलकांनी अमेरिकेचा बदला घेण्याची मागणी केली आहे. दरम्यान, इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामनेई यांच्या अध्यक्षतेखाली राजधानी तेहरानमध्ये बैठक झाली. खमेनेई यांच्या अध्यक्षतेखाली प्रथमच बैठक झाली.

अधिक वाचा : कारवाई अमेरिकेची, गळचेपी भारताची

पश्चिम आशियातील वाढता तणाव लक्षात घेता सोशल मीडियापासून मुत्सद्दी मंडळींपर्यंत तिसरे महायुद्ध सुरू होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तिसरे महायुद्ध सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. इराण अमेरिकेच्या सैन्य तळांवर तसेच पश्चिम आशियातील अमेरिकेच्या सैन्यांना लक्ष्य करण्याची शक्यता आहे. इतकेच नव्हे, तर इराण अमेरिकेचा घनिष्ठ मित्र असलेल्या इस्राईल सैन्यांना, होर्मूझच्या खाडीतील तेल टँकर तसेच सौदी अरेबियाच्या तेल ठिकाणांवर हल्ला करण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हेजबुल्लाह, हौथी बंडखोर आणि सिरियाचे अध्यक्ष बशर अल असद यामध्ये मदत करू शकतात.

अधिक वाचा : आखातावर युद्धाचे ढग

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news