

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपुरातील पूरपरिस्थितीची पाहणी करताना रविवारी (दि. २४) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका नागरिकाचा हात ओढला, असा आरोप करीत विरोधकांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल केला होता. पण 'त्या' संबंधित व्यक्तीने या विषयातील वस्तूस्थिती आज कथन केली.
व्हायरल व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीने म्हटंले आहे की, ''उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्या भागात पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले. यावेळी नागरिकांशी ते चर्चा करीत असताना गर्दीमुळे सुरक्षारक्षक आणि पोलिस मला फडणवीस यांच्यापर्यंत पोहचू देत नव्हते. ही गोष्ट फडणवीस यांच्या लक्षात येताच त्यांनी माझा हात धरला आणि चल बाबा मी तुझ्या घरी येतो असे म्हणत मला ते माझ्या घरी पाहणी करायला घेऊन गेले.'' आता स्वतः या नागरिकानेच वस्तूस्थिती समोर आणल्याने विरोधकाना चपराक बसली आहे.