लोकसभा अध्यक्षपदासाठी आज मतदान

‘रालोआ’च्या ओम बिर्लांविरुद्ध ‘इंडिया’चे के. सुरेश मैदानात
Lok Sabha Speaker Election
लोकसभा अध्यक्षपदासाठी आज मतदान होणार आहे.Pudhari News NetWork
Published on
Updated on

नवी दिल्ली : लोकसभेचे उपाध्यक्षपद विरोधी पक्षांना देण्यास सरकारने नकार दिल्यानंतर अध्यक्षपदाची निवड एकमताने होण्याची शक्यता मावळली असून, आता 48 वर्षांनंतर प्रथमच लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी बुधवारी निवडणूक होणार आहे. भाजपप्रणीत रालोआचे ओम बिर्ला आणि इंडिया आघाडीकडून काँग्रेसचे के. सुरेश यांच्यात निवडणूक होणार आहे.

संसद अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच संविधान बदलाच्या मुद्द्यावर सत्ताधारी रालोआ आघाडी सरकारला कोंडीत पकडणार्‍या काँग्रेस व विरोधी इंडिया आघाडीने मंगळवारी लोकसभा अध्यक्षपदासाठी आपला उमेदवार घोषित केला आहे. त्यामुळे आता लोकसभा अध्यक्षपदासाठी 48 वर्षांनंतर निवडणूक होणार आहे. भाजपप्रणीत रालोआ आघाडीचे उमेदवार ओम बिर्ला तर इंडिया आघाडीकडून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सुरेश मैदानात उतरले आहेत.

लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नामांकनपत्र दाखल करण्याच्या आजच्या मुदतीत सत्ताधारी रालोआकडून ओम बिर्ला यांनी उमेदवारी अर्ज भरला. विरोधी इंडिया आघाडीने ठरविल्याप्रमाणे के. सुरेश यांचे नामांकन दाखल केले. बुधवारी (26 जून) सकाळी 11 वाजता लोकसभा अध्यक्षपदासाठी मतदान होणार आहे. तत्पूर्वी लोकसभा अध्यक्षपदासाठी विरोधी पक्षांची सहमती घेऊन उमेदवार निश्चित करण्याचे सत्ताधारी भाजप व रालोआचे प्रयत्न अयशस्वी ठरले. विरोधकांनी सत्ताधार्‍यांची विनंती धुडकावून लोकसभा अध्यक्षपदासाठी आपल्या उमेदवाराची घोषणा केली.

उपाध्यक्षपदाची खर्गेंची अट नाकारली

लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक टाळण्यासाठी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी विरोधी पक्षांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला. राजनाथ सिंह यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी चर्चा करून लोकसभा अध्यक्षांची निवड सर्वसहमतीने करण्याची विनंती केली. लोकसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी आम्ही सहकार्य करायला तयार आहोत. पण उपाध्यक्षपद विरोधी पक्षांना मिळाले पाहिजे, अशी अट खर्गे यांनी राजनाथ सिंह यांच्यापुढे ठेवली. मात्र विरोधकांची ही अट स्वीकारण्यास सत्ताधार्‍यांनी नकार दिला.

उपाध्यक्षपद विरोधी पक्षांना द्या ः राहुल गांधी

विरोधी पक्षांना लोकसभेचे उपाध्यक्षपद मिळाले पाहिजे, या मागणीवर आम्ही ठाम आहोत, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी पक्षांकडून सकारात्मक सहकार्याची अपेक्षा करतात. मात्र ते वारंवार आमच्या नेत्याचा अपमान करीत आहेत. सर्वच विरोधी पक्ष सरकारला सहकार्य करण्यास तयार आहेत. पण परंपरेनुसार लोकसभा उपाध्यक्षपद आम्हाला मिळालेच पाहिजे, असे राहुल गांधी यांनी म्हटले.

विरोधकांच्या राजकारणाचा निषेध : पीयूष गोयल

लोकसभा अध्यक्षांची निवड सर्वसहमतीने करण्याचा सरकारचा प्रयत्न असताना विरोधी पक्षांकडून उपाध्यक्षपद मिळण्याची अट पुढे करणे योग्य नाही. विरोधकांच्या या राजकारणाचा आम्ही निषेध करतो, असे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले. लोकसभा अध्यक्ष हा कोण्या एका पक्षाचा अथवा आघाडीचा नसतो. तो संपूर्ण सभागृहाचा प्रमुख असतो. या पदावरील व्यक्तीची निवड ही सर्वसहमतीने होणे आवश्यक आहे. विरोधी पक्षांनी ही परंपरा मोडीत काढल्याचा आरोप गोयल यांनी केला.

एकीकडे या निवडणुकीमुळे पहिल्याच अधिवेशनात रालोआ विरुद्ध इंडिया आघाडी असा थेट समाना बघायला मिळणार आहे. यात आकड्यांच्या बाबतीत रालोआ वरचढ असले तरी या निवडणुकीत गुप्त मतदान होत असल्याने रालोआ आणि इंडिया आघाडी यापैकी कोणाची मते फुटतात का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

तृणमूलचा काँग्रेसवर आरोप

के. सुरेश यांचे नाव काँग्रेसने जाहीर केल्यावर तृणमूल काँग्रेसने आपली नाराजी जाहीर केली आहे. काँग्रेसने उमेदवाराची घोषणा करण्याआधी तृणमूलला विश्वासात घेतले नाही, आम्ही सतत त्यांच्याकडे विचारणा करत होते, असे तृणमूलचे ज्येष्ठ खासदार सुदीप बंडोपाध्याय यांनी म्हटल्याने इंडिया आघाडीतच फूट पडली आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news