पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील एका मुस्लिम तरुणीच्या प्रश्नावर कट्टरतावादी, वादग्रस्त इस्लामिक धर्मोपदेशक झाकीर नाईक ( Zakir Naik) भडकला. त्याने जाहीर कार्यक्रमात थेट तरुणीला माफी मागण्यास सांगितले. तिने माफी मागणार नसल्याचे स्पष्ट करत पुन्हा एकदा आपल्या प्रश्नाचा पुन्नरुच्चार केला. या कार्यक्रमात नेमकं काय घडले ते जाणून घेवूया
पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील एका मुस्लिम तरुणीने जाहीर कार्यक्रमात प्रश्न केला की, मी जिथून आले आहे, तिथले लोक पूर्णपणे इस्लामचे पालन करतात. महिला कोणत्याही कामाशिवाय घराबाहेर पडत नाहीत. पुरुष नमाज अदा करत नाहीत, पण शुक्रवारी तबलीघी जमातच्या कार्यक्रमांना जातात. त्या लोकांचे सामाजिक वर्तनही धर्मावर आधारित असते. असे असतानाही तेथे अंमली पदार्थांचे व्यसन, व्याज, व्यभिचार आणि मुलांचा लैंगिक छळ वाढत आहे. या दुष्कृत्यांनी तिथे मूळ धरले आहे. समाजाची अधोगती होत असताना उलेमा यावर काहीच का बोलत नाही, असा सवाल तिने केला.
"तरुणीच्या प्रश्नाला उत्तर देताना झाकीर नाईक म्हणाला की, 'तुम्ही म्हणता की महिला कामाशिवाय घराबाहेर पडत नाहीत. मी म्हणतो की. कोणीही कामाशिवाय बाहेर जाऊ नये. पुरुषांनीही जाऊ नये. मी पण कामाशिवाय घराबाहेर पडत नाही. इतकंच नाही तर मुलांचा लैंगिक छळ होतो आणि असं करणारी माणसं मुस्लिम आहेत हा महिलेचा प्रश्नच चुकीचा असल्याचं झाकीर नाईक म्हणाले. पेडोफिलिया (मुलांसोबत लैंगिक संबंध) इस्लाममध्ये चुकीचे मानले जाते. त्यामुळे, जर कोणी मुस्लिम असेल तर तो पेडोफिलिया करू शकत नाही आणि जर त्याने असे केले तर तो मुस्लिम असू शकत नाही," असेही त्यांनी स्पष्ट केले.
झाकीर नाईक म्हणाला की, इथले लोक मुस्लिम आहेत आणि पेडोफिलिया करतात, असे तरुणीचे म्हणणे चुकीचे आहे. असे बोलून तुम्ही इस्लामची बदनामी केली असून तुम्ही माफी मागावी, अशी मागणीही झाकीर नाईक याने केली. यावर मुलीने माफी सोडाच पुन्हा आपल्या प्रश्नाची पुनरावृत्ती केली. लोक इस्लामला दोष देतात आणि माफीही मागत नाहीत हे विचित्र आहे, असे झाकीर म्हणाला.
झाकीर नाईक 2017 मध्ये भारतातून मलेशियाला पळून गेला होता. त्यावेळी तत्कालीन मलेशियाचे पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांच्या सरकारने त्याला सरकारी संरक्षण दिले. त्याच्यावर प्रक्षोभक भाषणे, मनी लाँड्रिंग आणि भारतात दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहेत. मे 2019 मध्ये, ईडीने झाकीर नाईकविरोधात टेरर फंडिंग प्रकरणात आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात म्हटलं होते की, आतापर्यंत त्याच्या 193 कोटी रुपयांच्या मालमत्तेची ओळख पटवली असून, त्यापैकी 50 कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. 2003-04 ते 2016-17 दरम्यान झाकीर नाईकला अज्ञात आणि संशयास्पद स्त्रोतांकडून 64 कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. 2012 ते 2016 या काळात झाकीर नाईकला 49.20 कोटी रुपये मिळाले होते, असेही ईडीने सांगितले होते.
झाकीर नाईक याच्याविरोधात ऑक्टोबर 2017 मध्ये राष्ट्रीय तपास संस्था ( एनआयए)ने आरोपपत्रही दाखल केले होते. या आरोपपत्रात एनआयएने झाकीर नाईकवर प्रक्षोभक भाषणे देऊन तरुणांना भडकावल्याचा आरोप केला होता. झाकीर नाईकचे व्हिडीओ पाहून तरुण प्रभावित होत असून, त्यातील काही दहशतवादी संघटनांमध्येही सामील होत असल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. एकूणच झाकीर नाईकवर कट्टरतावादाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे.दरम्यान, मलेशियाचे पंतप्रधान महाथीर मोहम्मद यांनी पूर्वीच नाईकच्या जीवास धोका असल्याच्या कारणावरून प्रत्यार्पणास विरोध केला आहे. जर दुसरा कोणता देश त्याला आश्रय देणार असेल तर आम्ही तयार आहोत, असे महाथीर यांनी म्हटले आहे.