दलाई लामा यांना मिळणार झेड श्रेणीची सुरक्षा
पुढारी ऑनलाईन डेस्क : बौद्ध धर्मगुरू दलाई लामा ( Dalai Lama) यांना आता झेड श्रेणीची सीआरपीएफ सुरक्षा मिळणार आहे. गुप्तचर विभागाच्या (IB) च्या अहवालानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.
गुप्तचर विभागाने गृह मंत्रालयाला एक अहवाल सादर केला होता. यामध्ये दलाई लामा यांना धोका असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने त्यांची सुरक्षा वाढवण्याचा आदेश जारी केला असल्याचे वृत्त ANIने दिले आहे.
वर्षानुवर्षे तिबेटींच्या न्यायासाठी लढत आहेत दलाई लामा
१९३५ मध्ये ल्हामो थोंडुप यांचा जन्म झालेल्या दलाई लामा यांना वयाच्या दोन वर्षापासून तिबेटी आध्यात्मिक नेते म्हणून त्यांच्या पूर्वसुरींचा पुनर्जन्म मानले जाते. १९४० मध्ये तिबेटची राजधानी ल्हासा येथे त्यांना १४ वे दलाई लामा म्हणून तिबेटी आध्यात्मिक नेते म्हणून मान्यता देण्यात आली. १९५० मध्ये चीनने तिबेटवर हल्ला केला. १९५९ मध्ये चीनविरुद्धच्या अयशस्वी उठावानंतर दलाई लामा भारतात आले. तेव्हापासून हिमाचल प्रदेशातील धर्मशाला शहरात त्यांचे वास्तव्य आहे. दलाई लामा वर्षानुवर्षे तिबेटींच्या न्यायासाठी लढत आहेत. १९८९ मध्ये त्यांना नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

