

नवी दिल्ली : नवी दिल्ली रेल्वे स्टेशनजवळील पहाडगंजमध्ये एका तरुणीचा मृतदेह आढळून आला. हॉटेलच्या बाथरूममधून रविवारी (दि.८) सकाळी ११ च्या सुमारास पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेतला. पोलीस घटनास्थळी येण्यापूर्वी मृत तरुणीचा प्रियकर घटनास्थळावरून पळून गेला होता. त्याचा पाठलाग करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्यानेच तरूणीची हत्या केल्याचा संशय आहे. पोलिसांनी घटनास्थळ सील केले असून प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, रिझर्व्हेशन रोड (पहाडगंज) येथील एका हॉटेलमध्ये एका तरुणीच्या मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना कॉलद्वारे मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला. पोलिस घटनास्थळी येण्याआधी या तरूणीचा प्रियकर घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान, पोलिसांना घटनास्थळावरून दोन ओळखपत्रे मिळाली. त्यानुसार, प्रियकर मुलाचे नाव सचिन (वय ३१) आणि मृत तरुणीचे नाव सारिका (वय २९) असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सारिका दुसऱ्या मुलाशी लग्न करू इच्छित होती. मात्र, सचिन या निर्णयावर खूप संतापला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या सचिनने सारिकाला संपवून टाकण्याचा निर्णय घेतला आणि ही हत्या केल्याचा संशय आहे.