

दरभंगा : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी काँग्रेस नेते राहुल गांधी, राजदचे तेजस्वी यादव आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची ‘इंडिया आघाडीची तीन माकडे’ म्हणून खिल्ली उडवली.
दरभंगा जिल्ह्यातील केओटी विधानसभा मतदारसंघात एका निवडणूक सभेला संबोधित करताना, या ज्येष्ठ भाजप नेत्याने म्हटले की, ही तीन नवीन माकडे सत्ताधारी एनडीएने केलेल्या चांगल्या कामांबद्दल पाहू शकत नाहीत, ऐकण्यास तयार नाहीत आणि बोलण्यास असमर्थ आहेत. ‘महात्मा गांधींच्या तीन माकडांनी वाईट पाहिले नाही, वाईट ऐकले नाही आणि वाईट बोलले नाही; पण आता आपल्याकडे इंडिया आघाडीची तीन माकडे आहेत. त्यांना चांगले काम दिसत नाही, ऐकू येत नाही आणि बोलताही येत नाही,’ असा टोला त्यांनी लगावला.
काँग्रेस, राजद आणि सपा बिहारमध्ये गुन्हेगारांना जवळ करत आहेत आणि घुसखोरांना राज्याच्या सुरक्षेशी तडजोड करण्याची परवानगी देत आहेत. हे तेच लोक आहेत, जे जातीच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडतात आणि दंगली घडवतात, असा आरोप आदित्यनाथ यांनी केला.