

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची राजधानी दिल्लीत भेट घेतली. जवळपास अर्धा तास चाललेल्या या भेटीमध्ये उत्तर प्रदेशातील प्रस्तावित मंत्रीमंडळ विस्तार आणि एसआयआरवर देखील चर्चा झाल्याचे समजते.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी विविध राज्यांचे मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि अर्थमंत्र्यांना भेटतात, त्यामुळे भेटीला हेही एक कारण असल्याचे समजते. दरम्यान, या भेटीची चांगलीच चर्चा भाजपसह दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात आहे. पंतप्रधान मोदींसह भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही योगी आदित्यनाथ यांनी भेट घेतली.
दिल्लीत विविध राज्यांचे मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला येत असतात. त्याप्रमाणे योगी आदित्यनाथ देखील आले होते. मात्र या भेटीला उत्तर प्रदेशात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांची पार्श्वभूमी आहे. पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीपूर्वी राज्य मंत्रिमंडळात काही फेरबदल होण्याची शक्यता आहे. यामध्ये काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते तर काहींना बढतीही दिली जाऊ शकते. काही विद्यमान मंत्र्यांना संघटनेत जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे तर संघटनेतील काही चेहरे मंत्रिमंडळात दिसू शकतात. मंत्रिमंडळ विस्तारात प्रादेशिक आणि सामाजिक संतुलन राखले जावे, ज्यामुळे सर्व वर्ग आणि प्रदेशांचे प्रतिनिधित्व सुनिश्चित होईल, असा विचार असल्याचे समजते.
योगी आदित्यनाथ यांच्या सध्याच्या मंत्रिमंडळात आधी ५४ मंत्री होते, ज्यापैकी जवळपास ८ जागा रिक्त आहेत. या जागांवर काही नवे चेहरे येतील तर काहींना बढती मिळेल. माजी प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांना मंत्रिमंडळात समाविष्ट केले जाऊ शकते. निवडणुकीच्या वर्षापूर्वी उत्तर प्रदेशातील सर्व भागांना प्रतिनिधित्व द्यावे आणि निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी करण्याचा पक्षासह योगी आदित्यनाथ यांचा मानस असल्याचे समजते.