Yogi Adityanath | जिथे गोळ्या चालल्या, तिथे दिवे उजळले!
अयोध्या (उत्तर प्रदेश); पीटीआय : ज्या अयोध्येत एकेकाळी रामभक्तांवर गोळ्या झाडण्यात आल्या, तिथे आज लाखो दिवे उजळत आहेत, अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. रामजन्मभूमी आंदोलनासंदर्भात विरोधी पक्षांनी घेतलेल्या भूमिकेवर त्यांनी सडकून टीका केली.
अयोध्येत नवव्या भव्य दीपोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. तत्पूर्वी त्यांनी प्रभू श्रीराम आणि सीता मातेचा राज्याभिषेक केला, तसेच त्यांचे पूजन, वंदन आणि आरती केली. या सोहळ्याच्या व्यासपीठावरून बोलताना योगी आदित्यनाथ यांनी जानेवारी 2024 मध्ये झालेल्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण नाकारल्याबद्दल विरोधी पक्षांना धारेवर धरले. भाषणात योगी म्हणाले, रामजन्मभूमी आंदोलनावेळी याच अयोध्येत काँग्रेसने रामाला काल्पनिक म्हटले होते, तर समाजवादी पक्षाने रामभक्तांवर गोळ्या चालवल्या होत्या. आज परिस्थिती बदलली आहे. एकेकाळी उत्तर प्रदेशी ओळख बनलेल्या गुन्हेगारी कृत्यांना आज येथील नागरिकांना सामोरे जावे लागत नाही. जिथे एकेकाळी गोळ्या झाडल्या जात होत्या, तिथे आता आम्ही दीप लावत आहोत.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण नाकारल्याबद्दल टीका करताना ते पुढे म्हणाले, हे तेच लोक आहेत जे बाबराच्या कबरीवर जाऊन नतमस्तक होतात. पण जेव्हा त्यांना राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण दिले जाते, तेव्हा ते नाकारतात.
विकास आणि वारसा यांचा अद्भुत संगम
अयोध्येच्या बदललेल्या स्वरूपावर प्रकाश टाकत मुख्यमंत्री म्हणाले की, आज अयोध्या विकास आणि वारसा यांचा अद्भुत संगम दर्शवत आहे. यंदाच्या दीपोत्सवाच्या भव्यतेबद्दल माहिती देताना ते म्हणाले, संपूर्ण उत्तर प्रदेशात 1 कोटी 51 लाख दिवे प्रज्वलित केले जात आहेत. 2017 मध्ये जेव्हा आम्ही पहिल्यांदा अयोध्येत दीपोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा दिवे कसे लावले जातात हे जगाला दाखवण्याचा आमचा उद्देश होता.

