UP Politics : योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार; आठ मंत्र्यांचा शपथविधी, प्रादेशिक आणि जातीय समीकरणांवर भर

Yogi Adityanath cabinet expansion : बंडखोर आणि अनुभवी नेत्यांना स्थान
UP Politics : योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार; आठ मंत्र्यांचा शपथविधी, प्रादेशिक आणि जातीय समीकरणांवर भर
Published on
Updated on

लखनऊ: उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारच्या मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार आज दुपारी ३.३० वाजता 'जन भवन' येथे अत्यंत उत्साहात पार पडला. राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी आठ नवनियुक्त मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या विस्तारामध्ये जुन्या जाणत्या चेहऱ्यांसह नव्या दमाच्या नेत्यांना संधी देऊन आगामी राजकीय आव्हाने पेलण्यासाठी भाजपने आपली रणनीती स्पष्ट केली आहे.

या शपथविधी सोहळ्यात भूपेंद्र चौधरी आणि मनोज कुमार पांडेय यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. डॉ. सोमेंद्र तोमर आणि अजित पाल यांची पदोन्नती करण्यात आली असून त्यांनी राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून शपथ घेतली. याशिवाय कृष्णा पासवान, कैलाश सिंह राजपूत, सुरेंद्र दिलेर आणि हंसराज विश्वकर्मा यांनी राज्यमंत्री म्हणून आपल्या कारकिर्दीची नवी इनिंग सुरू केली आहे.

बंडखोर आणि अनुभवी नेत्यांना स्थान

योगी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात पंचायती राज मंत्री राहिलेले आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांचे पुन्हा मंत्रिमंडळात पुनरागमन झाले आहे. त्यांच्यासोबतच समाजवादी पक्षातून बंडखोरी करणारे रायबरेलीच्या ऊंचाहार मतदारसंघाचे आमदार मनोज कुमार पांडेय यांनीही कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. पांडेय यांनी अखिलेश यादव यांच्या सरकारमध्येही कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले आहे.

नव्या मंत्र्यांमध्ये सामाजिक समतोल राखण्याचा विशेष प्रयत्न करण्यात आला आहे. वाराणसीचे विधान परिषद सदस्य हंसराज विश्वकर्मा (अतिपिछडा वर्ग), फतेहपूरच्या खागा मतदारसंघाच्या आमदार कृष्णा पासवान (अनुसूचित जाती), अलिगडमधील खैरचे आमदार सुरेंद्र दिलेर आणि कनौजच्या तिर्वा मतदारसंघाचे आमदार कैलाश सिंह राजपूत यांनी पहिल्यांदाच राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

पदोन्नती आणि सत्तेचा समतोल

मंत्रिमंडळ विस्तारात दोन मंत्र्यांचा दर्जा वाढवण्यात आला आहे. मेरठ दक्षिणचे आमदार डॉ. सोमेंद्र तोमर, जे आतापर्यंत ऊर्जा विभागात राज्यमंत्री होते, त्यांना आता स्वतंत्र प्रभार देण्यात आला आहे. तसेच कानपूर देहातच्या सिकंदरा मतदारसंघातील आमदार अजित पाल यांचीही पदोन्नती झाली असून, त्यांच्याकडे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचा स्वतंत्र प्रभार सोपवण्यात आला आहे.

राजकीय पार्श्वभूमी आणि जातीय समीकरणे

योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार ५ मार्च २०२४ रोजी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी झाला होता. त्यावेळी ओमप्रकाश राजभर, दारासिंग चौहान, अनिल कुमार आणि सुनील कुमार शर्मा या चार नेत्यांचा समावेश करण्यात आला होता. दरम्यान, जितीन प्रसाद यांची केंद्रात वर्णी लागल्यानंतर कॅबिनेट मंत्र्यांचे एक पद रिक्त झाले होते.

उत्तर प्रदेशातील विधानसभा आणि विधान परिषदेतील भाजपच्या संख्याबळाचा विचार करता, पक्षाने जातीय समीकरणांची मोठी फळी उभारली आहे. विधानसभेत भाजपच्या २५८ आमदारांमध्ये ओबीसी (८४), अनुसूचित जाती (५९), राजपूत (४५) आणि ब्राह्मण (४२) अशा सर्वच समाजांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला आहे. विधान परिषदेतही ७९ सदस्यांच्या माध्यमातून ओबीसी, राजपूत आणि ब्राह्मण समाजाला मुख्य प्रवाहात ठेवले आहे.

या विस्ताराच्या माध्यमातून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पूर्व ते पश्चिम उत्तर प्रदेशला सांधण्याचा प्रयत्न केला असून, आगामी काळातील विकासाच्या कामांना गती देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या शपथविधी सोहळ्याला भाजपचे वरिष्ठ नेते आणि प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news