

नवी दिल्ली : डोंगराळ राज्य असलेल्या उत्तराखंडमध्ये भूस्खलनामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. रुद्रप्रयागमध्ये झालेल्या भूस्खलनामुळे बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग बंद झाला असून, गंगोत्री महामार्ग धरासू आणि सोनागडजवळ बंद आहे. यमुनोत्री महामार्गही नारदचट्टीजवळ दरड कोसळल्याने बंद आहे. प्रशासनाकडून ढिगारा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, काही ठिकाणी वाहतूक हळूहळू पूर्ववत केली जात आहे. देशाच्या विविध भागांत पावसाने रौद्र रूप धारण केले असून, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.
तर दुसरीकडे, उत्तर प्रदेशात यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने पुराचे पाणी थेट ताजमहालच्या भिंतींपर्यंत पोहोचले आहे. गुजरातमधील राज्यातील जुनागढ जिल्ह्यात केवळ 12 तासांत 331 मिमी पावसाची नोंद झाली, ज्यामुळे अनेक भाग पाण्याखाली गेले. पोरबंदर जिल्ह्यातील एका शाळेत अडकलेल्या 46 विद्यार्थी आणि 4 शिक्षकांची एनडीआरएफच्या पथकाने यशस्वीरित्या सुटका केली.
हिमाचल प्रदेशात मान्सूनच्या सुरुवातीपासूनच पावसाने हाहाकार माजवला आहे. 20 जूनपासून राज्यात पावसाशी संबंधित विविध दुर्घटनांमध्ये 145 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले असून, राज्याला आतापर्यंत सुमारे 2281 कोटी रुपयांचा फटका बसला आहे.