नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन: पैलवानाच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशीलकुमार याला भारतीय रेल्वे सेवेतून निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती उत्तर रेल्वेचे प्रवक्ता दीपक कुमार यांनी मंगळवारी टि्वटरच्या माध्यमातून दिली.
सुशीलकुमार हा उत्तर रेल्वेमध्ये वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापकपदावर कार्यरत होता. २०१५ मध्ये शालेय स्तरावर कुस्ती खेळाच्या विकासासाठी छत्रसाल स्टेडियममध्ये त्याची विशेष कार्यअधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्याच्या प्रतिनियुक्तीचा कालावधी दिल्ली सरकारने २०२०पर्यंत वाढविला होता. २०२१मध्ये त्याने मुदतवाढ मागितली होती. पण, दिल्ली सरकारने यास नकार दिला होता.
सुशीलकुमार याच्यावर छात्रसाल स्टेडियममध्ये ज्युनिअर गोल्ड मेडलिस्ट पैलवानाच्या हत्येप्रकरणात सहभागी असल्याचा आरोप आहे.१८ दिवस तो फरार होता.दिल्ली पोलिसांनी त्याला रविवारी अटक केली होती. याच दिवशी दिल्ली सरकारचा अहवाल रेल्वे प्रशासनास प्राप्त झाला होता. यामध्ये सुशीलकुमारवर हत्येप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, त्याला निलंबित करावे, असे नमूद केले होते, असेही दीपक कुमार यांनी म्हटलं आहे.