

Crime News
हैदराबाद : निद्रानाशाच्या गंभीर समस्येने त्रस्त असलेल्या एका महिला सॉफ्टवेअर अभियंत्याने आपल्या सहा महिन्यांच्या बाळाला हातात घेऊन सहाव्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर चमत्कारिकरीत्या बाळ किरकोळ जखमी होऊन बचावले. हैदराबादमधील मयुरी नगर येथील लक्ष्मी प्रेस्टिज अपार्टमेंटमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.
ईशा साहू (वय ३७) असे मृत महिलेचे नाव असून, तिने बाळाला घेऊन इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पडताना बाळ तिच्या हातातून निसटल्याने त्याचा जीव वाचल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि आपत्कालीन सेवा पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी बाळाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी बाळाची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, उंचावरून पडल्यामुळे ईशा साहूला गंभीर दुखापत झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ईशा गेल्या काही महिन्यांपासून झोप न लागणे आणि निद्रानाशाच्या समस्येने त्रस्त होती. झोपेच्या समस्येमुळे तिच्यावर मानसिक ताण वाढला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, या टोकाच्या निर्णयामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. कुटुंबीयांसह संबंधित व्यक्तींची चौकशी करण्यात येत असून, घटनेच्या सर्व पैलूंचा सखोल तपास केला जात आहे.