

Woman jailer Jail Officer Married Murder Convict In Chhatarpur
छतरपूर : प्रेमाला सीमा नसते आणि त्याला कसलीच बंधने नसतात, याची प्रचिती देणारी एक अनोखी प्रेमगाथा मध्य प्रदेशात पाहायला मिळाली आहे. सतना येथील केंद्रीय कारागृहात कार्यरत असलेल्या सहायक जेल अधीक्षक फिरोझा खातून आणि जन्मठेपेची शिक्षा भोगून बाहेर पडलेला कैदी धर्मेंद्र सिंह यांनी लग्नगाठ बांधली आहे. हिंदू रितीरिवाजांनुसार पार पडलेल्या या विवाहाची सध्या संपूर्ण देशात चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छतरपूर जिल्ह्यातील चंदला येथील रहिवासी असलेला धर्मेंद्र सिंह हा हत्येच्या एका प्रकरणात सतना येथील मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. याच कारागृहात फिरोझा खातून या सहायक जेल अधीक्षक (वारंट इंचार्ज) म्हणून कार्यरत होत्या. कारागृहातील कामकाजादरम्यान धर्मेंद्र हा वारंट विभागात मदतनीस म्हणून काम करत असे. कामाच्या निमित्ताने दोघांमध्ये संवाद सुरू झाला आणि या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. काही काळानंतर या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांनीही समाज व धर्माची पर्वा न करता आयुष्यभर एकमेकांची साथ देण्याचा निर्णय घेतला.
धर्मेंद्रची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर या जोडप्याने विवाह करण्याचा संकल्प केला. मात्र, या आंतरधर्मीय विवाहास फिरोझा यांच्या कुटुंबीयांचा तीव्र विरोध होता. कुटुंबीयांनी या विवाहास नकार देत पाठ फिरवली. अशा परिस्थितीत सतना येथील बजरंग दलाचे कार्यकर्ते त्यांच्या मदतीला धावून आले. छतरपूर जिल्ह्यातील लवकुशनगर येथे हिंदू वैदिक पद्धतीनुसार आणि मंत्रोच्चारांच्या घोषात हा विवाह सोहळा पार पडला. फिरोझा यांच्या कुटुंबातील कोणीही उपस्थित नसल्याने, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन फिरोझा यांचे कन्यादान केले आणि एका भावाप्रमाणे सर्व विधी पार पाडले.
कायद्याचे रक्षण करणाऱ्या एका जबाबदार महिला अधिकाऱ्याने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या, परंतु शिक्षा भोगून सुधारलेल्या व्यक्तीशी लग्न केल्यामुळे या घटनेकडे सकारात्मक दृष्टीनेही पाहिले जात आहे. 'प्रेम आणि माणुसकीला कोणताही धर्म नसतो', असा संदेश फिरोझा खातून यांनी आपल्या कृतीतून दिला आहे. कारागृहाच्या चार भिंतींच्या आड सुरू झालेली ही लव्हस्टोरी आता एका विवाह बंधनात रूपांतरित झाली आहे.
या आगळ्यावेगळ्या विवाहाची बातमी वाऱ्यासारखी पसरताच कारागृह प्रशासनासह सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. कर्तव्य बजावताना दाखवलेली प्रामाणिकता आणि वैयक्तिक आयुष्यात घेतलेला धाडसी निर्णय, यासाठी अनेक स्तरांतून या नवदांपत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.