

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : वर्षाच्या सुरुवातीला सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या सोने व चांदीच्या दरात सध्या ऐतिहासिक घसरण सुरू आहे. २०२६ या आर्थिक वर्षात सोन्याची किंमत उच्चांकी भावावरून ५४ हजार, तर चांदी तब्बल २ लाख ४८ हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे.
सध्या मौल्यवान धातूत घसरण होत असली तरी आगामी काही वर्षांत सोन्याचे दर तेजीत राहतील, असा अंदाज अमेरिकेतील आघाडीची गुंतवणूक बँक ‘गोल्डमन सॅक्स’ने व्यक्त केला आहे. २०२८ पर्यंत १० ग्रॅम सोन्याची किंमत १ लाख ६७ हजार २३२ रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
‘इन्वेस्टिंग डॉट कॉम’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, २०२७ च्या अखेरपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर प्रति ट्रॉय औंस (सुमारे ३१.१० ग्रॅम) ४,६५० डॉलरपर्यंत पोहोचू शकतात. म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये १ लाख ३८ हजार ९११ रुपये प्रति १० ग्रॅम) ऑक्टोबरमधील ४,१०० डॉलरच्या (१,२२,४३८ भारतीय रुपये) सरासरी दराच्या तुलनेत ही वाढ सुमारे १३ टक्के असेल. व्याज दर कपात सुरू झाल्यास पाश्चिमात्य देशांतील गुंतवणूक मागणी पुन्हा वाढेल.