

पुढारी ऑनलाईन डेस्क : एकीकडे जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश, असे बिरुद भारत मिरवत असतानाच दक्षिणीकडील राज्यांतील राजकीय नेते लोकसंख्या वाढीला खतपाणी घालत असल्याचे दिसत आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन.चंद्राबाबू नायडू यांनी दोनपेक्षा अधिक मुलांना जन्म द्यावा, असा पुनरुच्चार करत आहेत. नायडू यांनी पुन्हा एकदा आपल्या भूमिकेचे समर्थन केले आहे. एखाद्या व्यक्तीला दोनपेक्षा जास्त मुले असतील तरच तो सरपंच, नगरसेवक किंवा महापौर होऊ शकतो, अशी मोठी घोषणा त्यांनी केली आहे. अधिक मुले जन्माला घालण्यास प्रोत्साहित करण्यासाठी राज्यात धोरण राबवले जाईल, अशी घाेषणाही त्यांनी केली.
यापूर्वी मुख्यमंत्री नायडू म्हणाले होते की, राज्यात विकास दर वाढला पाहिजे. प्रत्येकाने याचा विचार केला पाहिजे आणि कुटुंबांनी किमान दोन किंवा त्याहून अधिक मुले जन्माला घालण्याचे ध्येय ठेवले पाहिजे. केंद्राच्या 'युथ इन इंडिया-२०२२' अहवालानुसार, आपल्या देशातील २५ कोटी तरुण १५ ते २५ वयोगटातील आहेत. पुढील १५ वर्षांत ते आणखी वेगाने घसरेल, अशीही भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली हाेती.
नुकतेच नरवरीपल्ले येथे बोलताना चंद्राबाबू नायडू म्हणाले की, एकेकाळी जास्त मुले असलेल्या व्यक्तींना पंचायत (निवडणुका) किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणूक लढवण्याची परवानगी नव्हती. मात्र आता मी असे म्हणतोय की, कमी मुले असलेली व्यक्ती निवडणूक लढवू शकत नाही. तुम्हाला दोनपेक्षा जास्त मुले असतील तरच तुम्ही सरपंच, नगरपालिका नगरसेवक, महानगरपालिका अध्यक्ष किंवा महापौर होऊ शकता. जुन्या पिढीला जास्त मुले होती तर सध्याच्या पिढीने ती एका अपत्यापुरती मर्यादित ठेवली आहे. तसेच काही 'हुशार' लोक आजकाल त्यांच्या उपजीविकेचा आनंद घेण्यासाठी डबल इनकम नो किड्स (DINK) ही संकल्पना स्वीकारत आहेत, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री नायडू म्हणाले, "तुमच्या पालकांना चार ते पाच मुले होती. आताच्या पिढीने अपत्याची मर्यादा एक एवढीच केली आहे. आता आणखी हुशार लोक म्हणू लागले आहेत की, दुप्पट उत्पन्न नाही तर मुले आम्हाला त्याचा आनंद घेऊ देत. त्यांच्या पालकांनी त्यांच्यासारखा विचार केला असता तर ते या जगात आले नसते. सर्व देशांनी ही चूक केली आहे आणि आपल्याला योग्य वेळी निर्णय घ्यावा लागेल."
यावेळी दक्षिण कोरिया, जपान आणि युरोप खंडातील देशांचा उल्लेख करून चंद्राबाबू नायडू म्हणाले की, "काही देशांनी केवळ संपत्ती निर्मिती, उत्पन्न वाढ यावरच लक्ष केंद्रित केले. आता त्यांना लोकांची गरज आहे. आता आपणही त्या परिस्थितीत पोहोचलो आहोत. भारताने दक्षिण कोरिया आणि जपानसारख्या इतर देशांनी केलेल्या चुका पुन्हा करू नयेत, जिथे जन्मदर कमी झाला आहे. आजकाल काही जोडपी मुले होण्यास टाळाटाळ करतात कारण त्यांना त्यांची कमाई वाटून घ्यायची नसते आणि ते पैसे स्वतःच्या आनंदासाठी वापरायचे असतात."