

बुटातील सापाचे दर्शन दरवर्षीच पावसाळ्यात घडते. सोशल मीडियावर मग त्याचे व्हिडीओ जोराने व्हायरल होतात. नेमके पावसाळ्यातच हे का घडते? पावसाळ्यात जमीन ओलसर असल्यामुळे सापांचा पारंपरिक अधिवास जसे की भेगा, बिळे यामध्ये पाणी शिरलेले असते. सापांना ओल्या जागा आवडत नाहीत. अशा स्थितीत शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी साप कोरड्या, ऊबदार जागा शोधत असतात. प्रामुख्याने दाराबाहेरील बूट, कोंबड्यांची खुराडी, गोठ्यातील सामान, वैरणीचा गठ्ठा, चुलीसाठी आणलेली लाकडे यामध्ये वेटोळे घालून ते बसलेले असतात.
बूट वापरण्यापूर्वी उलटे करून झटकावेत. आतमध्ये काही नाही ना, याची खात्री करावी. लाकडांचे ढीग, वैरणीचे बिंडे झाकून ठेवावेत. शक्यतो ते उंचावर ठेवावेत. घराभोवतीचा परिसर स्वच्छ आणि मोकळा ठेवावा. रात्री बाहेर फिरताना टॉर्चचा वापर करावा. साप हा अकारण दंश करत नाही. त्याचे वर्तन हे त्याच्या सुरक्षेच्या पवित्र्यातून असते. त्यामुळे साप दिसल्यास त्याला मारण्याऐवजी सर्पमित्रांशी संपर्क करावा. सर्पदंश झाल्यास घाबरून न जाता लगेच नजीकच्या आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घ्यावेत.
नागाचा फुत्कार भल्या-भल्यांना घाम फोडतो. साप पाहिला की भीती वाटणे, नैसर्गिक; पण भीतीपोटी अज्ञान पसरवणे योग्य नाही. त्याला समजून घेतले तर भीती नाहीशी होते आणि जागरूकता वाढते. नागाचे फुत्कारणे हा हल्ला नसतो, तर स्वसंरक्षणासाठी त्याने घेतलेला तो पवित्रा असतो. त्यामुळे विषारी, बिनविषारी साप दिसला की घाबरून न जाता शांतपणे त्याच्यापासून अंतर ठेवणे आवश्यक आहे. त्याला मारू नये, कारण तो निसर्गाच्या अन्नसाखळीतील आवश्यक घटक आहे. नाग, मण्यार, घोणस, फुरसे हे आपल्याकडे आढळणारे विषारी साप. बाकी बिनविषारी सापांच्या प्रजाती आणि संख्याच जास्त आहेत.
पावसाळ्यात उंदीर, बेडूक, सरडे यांची संख्या वाढते. अशी शिकार ही सापासाठी पर्वणीच. त्यामुळे साप अशा शिकारीच्या मागे फिरतात. त्यातून सापाचे मानवी परिसरात आगमन वाढते. साप थंड रक्ताचा (कोल्ड ब्लडेड ) प्राणी आहे. तो शरीराचे तापमान नियंत्रित करू शकत नाही. उन्हाळ्यात शरीराचे तापमान वाढले की ते बाहेर पडतात. सावली, गारव्याच्या ठिकाणी जातात.
पावसाळ्यात साप कोणत्याही वस्तूच्या पाठीमागे, खाली किंवा आतमध्ये आसरा घेतात. ते ऊबदार जागा निवडतात. बूट उलटे करून झाडून घ्यावेत. लांब काठीने जळण बाजूला घेणे, त्यावर काठी आपटून त्यामध्ये काही लपले नाही ना? याची खात्री करून घेणे महत्त्वाचे. जनावरांसाठी चारा घेताना वैरणीत थेट हात न घालता प्रथम लांब काठीने वैरण बाजूला सारावी, हात न लावता नीट चाचपणी करावी.
अमोल जाधव, संस्थापक-सदस्य, नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी, सांगली