

नवी दिल्ली: वक्फ (सुधारणा) विधेयक हे सामान्य मुस्लिमांविरोधात नसून, त्यांच्या लाभासाठी आहे. वक्फकडे इतकी संपत्ती असताना मुस्लिम समाज गरीब का, असा सवाल करत सत्ताधाऱ्यांनी विधेयकाच्या समर्थनार्थ केला. तर हे विधेयक घटनाविरोधी आहे. मुस्लिम समाजाच्या जमिनी हडपण्याचा डाव असल्याचा आरोप करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
विधेयक हिंदू विरुद्ध मुस्लिम नाही, तर हा कायदा विरुद्ध अराजकता, संविधान विरुद्ध भ्रष्टाचार आणि भारत विरुद्ध अंतर्गत फूट पाडण्याचा प्रयत्न आहे. अनेक देशांमध्ये वक्फ बोर्ड केंद्र सरकारच्या नियमनाखाली कार्य करतात, असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले. त्यांनी विचारले कर्नाटक सरकारने ४.५० कोटी रुपये गोळा केले, ते पैसे कुठे खर्च केले? तुम्ही त्याचे उत्तर दिले पाहिजे. हे पैसे मशिदीमधून घेतले की वक्फ बोर्डाकडून? ठाकूर यांनी आरोप केला की, वक्फ सुधारणा विधेयक काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणावर शेवटची खेळी ठरेल. त्यांनी पंडित नेहरूंवरही भारताच्या फाळणीचा आरोप केला
काँग्रेसचे उत्तर प्रदेशमधील खासदार इम्रान मसूद यांनी लोकसभेत बोलताना सांगितले की, वक्फ मुस्लिमांसाठी पवित्र आहे. हे विधेयक तयार करणाऱ्यांना वक्फ इस्लामी तत्त्वे आणि धार्मिक कायद्याचे महत्त्व याची समज नाही. लालन सिंग यांनी सांगितले की, वक्फ सुधारणा विधेयक सुरु झाल्यापासून विरोधक हे मुस्लिमांविरोधी असल्याचा खोटा प्रचार करत आहेत. मात्र, हे विधेयक मुस्लिमांविरोधी नाही.
भाजप खासदार रविशंकर प्रसाद यांनी वक्फ (सुधारणा) विधेयकावर भाष्य करताना वक्फ मंडळाला फक्त एक कायदेशीर संस्था असल्याचे सांगितले आणि सार्वजनिक कल्याणासाठी त्याच्या योगदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी संसदेत वक्फ (सुधारणा) विधेयकावर सरकारवर गंभीर आरोप केले. त्यांनी दावा केला की, हे विधेयक एक नवा पायंडा पाडत असून, भविष्यात इतर धार्मिक समुदायांना लक्ष्य केले जाऊ शकते.
काँग्रेस खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी सरकारवर आरोप केला की, वक्फ (सुधारणा) विधेयक संसदेत गोंधळाच्या परिस्थितीत मंजूर केले जात आहे आणि खासदारांना योग्य चर्चा करण्याची संधी दिली जात नाही.
वक्फ बोर्डाची आधी निवडणूक होत असे. आता मात्र या विधेयकानुसार वक्फ बोर्डावर सदस्यांचे नामांकन केले जाईल. याचा अर्थ सरकार आपल्या मर्जीतील लोकांना बोर्डावर नामांकित करेल. यामध्ये दोन बिगर मुस्लिम सदस्य असतील. यामुळे उद्या हिंदू मंदिरांच्या समितीत बिगर हिंदू आणले जातील याची भीती वाटते. असे केले तर त्याचा शिवसेना विरोध करेल, अशा शब्दांत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खा. अरविंदसावंत यांनी भूमिका मांडली. या विधेयकावरील 'जेपीसी'च्या बैठकांमध्ये विस्तृत चर्चा झाली नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत बुधवारी वक्फ दुरुस्ती विधेयकाचे समर्थन केले. यावेळी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. बाळासाहेब ठाकरे असते, तर ठाकरे गटाच्या खासदारांनी वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात भाषण केले असते का, असा सवाल श्रीकांत शिंदे यांनी यावेळी केला.
लोकसभेत मांडलेले वक्फ सुधारणा विधेयक हे प्रागतिक आणि पुरोगामी पाऊल आहे. संविधानाच्या प्रस्तावनेतील धर्मनिरपेक्षतेचे तत्त्वच यातून प्रतिबिंबित होत आहे. अनेकांच्या जमिनी, गावच्या गावे वक्फवर चढवायच्या आणि नंतर त्या जमिनी लाटायचे काम काँग्रेस नेत्यांनी केल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. वक्फ सुधारणा विधेयकामुळे जमिनी हडपणाऱ्यांना चाप बसणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
फडणवीस म्हणाले, लोकसभेत मांडलेले वक्फ सुधारणा विधेयक हे कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. कोणाच्याही आस्थेला ठेच पोहोचविणारे नाही, तर भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेतील धर्मनिरपेक्षतेचे तत्त्वच यातून प्रतिबिंबित होत आहे. या सुधारणा विधेयकाच्यानिमित्ताने एक प्रागतिक, पुरोगामी पाऊल टाकण्यात आले आहे. ज्यांची सद्सद्विवेकबुद्धी जिवंत आहे, अशी प्रत्येक व्यक्ती या सुधारणा विधेयकाला पाठिंबा देईल, असेही फडणवीस म्हणाले. लोकसभेत मांडण्यात आलेले हे विधेयक नक्कीच संमत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
निवडणुकीत मुस्लिम मतांसाठी राजकारण करणाऱ्यांचे खरे चेहरे वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या निमित्ताने समोर आले, अशी टीका शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. महायुती सरकारच्या १००दिवसांच्या कृती आराखड्याचा आढावा घेतल्यानंतर शिंदे पत्रकारांशी बोलत होते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून राहुल गांधी यांच्या सांगण्यानुसार वागणाऱ्या 'उबाठा'ची दुटप्पी भूमिका दिसत आहे. सोयीचे राजकारण करणारे लोक वक्फ बोर्ड विधेयकाचा हिंदुत्वाशी संबंध नाही, असे बोलतात तेव्हा त्यांच्या भूमिकेवर संशय निर्माण होतो. आता ते बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जातात की, राहुल गांधी सांगतात ते करतात, हे पाहावे लागेल, असा टोलाही शिंदे यांनी लगावला.
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकासंदर्भात शिवसेनेने यापूर्वीच स्पष्ट आणि सडेतोड भूमिका घेतली आहे. आम्ही कधीही मतांसाठी सोयीचे राजकारण केले नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांसोबत आम्ही पुढे जात आहोत. आम्ही सत्तेसाठी विचारांशी कधीही तडजोड केली नाही, असेही शिंदे म्हणाले.
सरकारने केवळ कायदे, फायदे आणि मालमत्ता न पाहता सर्वांच्या भावनांचा विचार करावा. हे विधेयक म्हणजे वक्फ बोर्डाचे सशक्तीकरण आहे की, त्यावर ताबा मिळवण्याचा डा आहे, असा सवाल खा. नीलेश लंके यांनी केला. वक्फ सुधारणा विधेयकावरील चर्चेत ते राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका मांडत होते. खा. लंके म्हणाले की, वक्फ बोर्डाचे अधिकार कमी न करता योग्य बदल करून त्यामध्ये सुसूत्रता आणण्याचे प्रयत्न करावेत. सशक्तीकरणाच्या नावाखाली संस्थेचे स्वातंत्र्य हरवू नये.