पुढारी ऑनलाईन डेस्क : Manipur new chief minister : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काही तासांतच म्हणजे रविवारी (दि.९) मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी राजीनामा दिला. आता नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावाबाबत दिल्लीत खल सुरु आहेत. लवकरच मुख्यमंत्रीपद वर्णी लागणार्या नेत्याचे नाव जाहीर होवू शकते, असे मानले जात आहे.
बिरेन सिंह यांच्यावर मणिपूरचे भाजप आमदार नाराज होते. याची गंभीर दखल भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतली. मणिपूर विधानसभेचे अधिवेशनही १० फेब्रुवारीपासून सुरू होणार होते. भाजप आमदार स्वतः सभागृहात सरकारवर प्रश्नांचा भिडेमार करतील, अशी परिस्थिती असल्याचेही मानले जात हाेते. त्यामुळे बिरेन सिंह यांच्यावर दबाव आणण्यात त्यांचे पक्षातीलच नेते यशस्वी झाल्याचेही चर्चा आहे.
भाजजप खासदार आणि ज्येष्ठ नेते संबित पात्रा हे मणिपूरमध्ये आहेत. त्यांनी राज्यपाल अजय भल्ला यांचीही भेट घेतली आहे. मणिपूरमधील नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावावर चर्चा करण्यासाठी ते तिथे उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे. मणिपूरच्या नवीन मुख्यमंत्रिपदासाठी ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री यमनम खेमचंद सिंह, कॅबिनेट मंत्री टी विश्वजित सिंह आणि विधानसभा अध्यक्ष टी सत्यव्रत यांची नावे आघाडीवर आहेत. तथापि, भाजप सखोल विचारविनिमयानंतरच कोणताही निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे. उल्लेखनीय म्हणजे, बिरेन सिंग यांच्या राजीनाम्यानंतर लगेचच राज्यपाल भल्ला यांनी विधानसभेचे अधिवेशन बोलावण्याचा मागील आदेश 'निरर्थक' घोषित केला.
बिरेन सिंग यांनी त्यांच्या पत्रात केंद्र सरकारला सध्या सुरु असलेले विकास काम सुरू ठेवण्याची विनंती केली. त्यांनी म्हटले आहे की, मणिपूरची प्रादेशिक अखंडता राखणे हे माझ्यासाठी सर्वात महत्वाचे काम आहे.मणिपूरची प्रादेशिक अखंडता त्याच्या हजारो वर्षांच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीच्या इतिहासामुळे आहे.
२७ मार्च २०२३ रोजी मणिपूर उच्च न्यायालयाने एक आदेश दिला होता. यामध्ये राज्य सरकारला मेईतेई समुदायाचा अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश करण्याबाबत लवकरच विचार करण्याचे निदर्शही दिले होते. या आदेशानंतर काही दिवसांनी, कुकी आणि मेइतेई समुदायांमध्ये हिंसाचार सुरू झाला. या हिंसाचारात अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत.